Maharashtra Assembly Election 2019 : पथनाट्य, बाहुलीच्या नाट्यातून दिला विद्यार्थ्यांनी संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:22 PM2019-10-18T12:22:21+5:302019-10-18T12:24:32+5:30
ताई - माई - अक्का चला मतदान करायला हवं. चला चला मतदान करू, देशाची लोकशाही बळकट करू, असा संदेश मंगळवारी पथनाट्यातून व बाहुलीच्या खेळातून देण्यात आला.
चिपळूण : ताई - माई - अक्का चला मतदान करायला हवं. चला चला मतदान करू, देशाची लोकशाही बळकट करू, असा संदेश मंगळवारी पथनाट्यातून व बाहुलीच्या खेळातून देण्यात आला.
स्वीप अभियानांतर्गत पथनाट्य व बाहुलीचा खेळ, रांगोळीतून मतदानाची टक्केवारी वाढावी, याबाबत मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावरील चौपाटीच्या मैदानावर हे अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी, निबंध, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती राबवण्यात येत आहे.
यावेळी चौपाटीच्या मैदानावर देवरूख येथील विद्यार्थ्यांनी मी मतदान करणारच असा संदेश देणारी रांगोळी काढली होती. त्या रांगोळीचे उद्घाटन कार्यकारी अभियंता संजय काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार जयराम सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, गटविकास अधिकारी सरिता पवार, गटशिक्षणाधिकारी राज महंमद देसाई, नायब तहसीलदार अनंत चव्हाण, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे व विद्यार्थी उपस्थित होते.
मतदान जरूर करा
कलाशिक्षक टी. एस. पाटील यांनी बाहुलीच्या नाट्यातून जनजागृती केली. तर सावर्डेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदान वाढण्यासाठी चला मतदान करू, चला मतदान करू, सुटीचा दिवस शॉपिंग करायला नाही, मतदान करायला आहे, असा संदेश दिला.