विद्यार्थ्यांच्या सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:31+5:302021-07-14T04:36:31+5:30

रत्नागिरी : शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील विद्यार्थी आता कोविडचा मुकाबला ...

Student participation | विद्यार्थ्यांच्या सहभाग

विद्यार्थ्यांच्या सहभाग

Next

रत्नागिरी : शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील विद्यार्थी आता कोविडचा मुकाबला करणाऱ्या कोविशिल्ड लस निर्मितीसाठी हातभार लावत आहेत. यामुळे रत्नागिरीचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कर्मचाऱ्यांची निदर्शने

रत्नागिरी : खासगीकरणाला विरोधासाठी आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. काळ्या फिती लावून त्यांनी शासनाचा निषेध केला. मोटार वाहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश नाचणकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्र शासनाने नवीन मोटार कायदा आणला. नवीन कायद्यामुळे खासगीकरणाचा प्रवेश ही बाब आरटीओ विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. याविरोधात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.

खवय्यांचा मोर्चा गोड्या पाण्यातील माशांकडे!

रत्नागिरी : पावसाने पुन्हा जोर धरल्याने खवळलेल्या समुद्रात मासेमारी शक्य होत नसल्याने समुद्रातील मासे खवय्यांसाठी दुर्मीळ झाले आहेत. त्यामुळे खवय्यांकडून गाेड्या पाण्यातील माशांना अधिक पसंती दिली जात आहे. सध्या खवय्यांनी आपला मोर्चा गाेड्या पाण्यातील माशांकडे वळवला आहे.

फूलझाडांची भेट

चिपळूण : ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत शहरातील खेड युवासेना विभागप्रमुख नीलेश आवले यांनी शहरातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय मराठी शाळेला फुलझाडांची भेट दिली. या वेळी ओंकार मोरे, सुजल शिंदे, प्रमोद काणेकर आदी उपस्थित होते. आवले यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप

दापोली : तालुक्यातील शिरखल-चिंचाळी येथील मारुती मंदिरात पालगड विभागातील ७४८ विद्यार्थ्यांना कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान महाराष्ट्र कल्याणचे संस्थापक अध्यक्ष संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे १ लाख ८१ हजार रुपये किमतीच्या ७४८ स्वाध्याय पुस्तिकांचे प्रभागातील जि. प. मराठी व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

शस्त्रक्रिया शिबिरासाठी तपासणी

दापोली : दापोली येथील शिवभक्त मंडळ व डेरवण येथील वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांकरिता मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १७ जुलै रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत शहरातील नर्सरी रोडवरील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या निवासस्थानी तपासणी करण्यात येणार आहे.

शाळा आली विद्यार्थ्यांच्या दारी

चिपळूण : बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याची संकल्पना पुढे आली असली तरी नेटच्या व्यत्ययामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानसाधनेत अडचणी येत आहेत. या सर्वाला छेद देत विद्यर्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सती शाळेने ‘शाळा आपल्या दारी’ हा नवा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार शिक्षक विद्यार्थ्यांच्या वाडीवस्तीवर जाऊन त्यांना ज्ञानाचे धडे देत आहेत.

लाडघर येथे वृक्षारोपण

दापोली : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत लाडघर यांच्या वतीने नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. तौक्ते वादळामुळे अनेक झाडे तुटून पडल्याने जालगाव येथील निसर्गप्रेमी नरेंद्र बर्वे यांनी ५०० रोपे मोफत दिली. शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे यांनी बर्वे यांच्याकडे रोपांची मागणी केली होती; त्यानुसार बर्वे यांनी रोपे दिली. यामुळे बर्वे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बिजघरमध्ये वृक्षारोपण

खेड : तालुका कृषी विभागातर्फे बिजघर येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे यांनी वृक्षारोपण केले. या वेळी त्यांनी शेतकरी, बागायतदारांना मार्गदर्शन केले. यानिमित्त तालुका कृषी अधिकारी यू.बी. सगभोर यांनी म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत फळबाग लागवड, भात लागवडीच्या विविध पद्धती, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना करून दिली.

Web Title: Student participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.