दापोली प्राथमिक शिक्षक समितीने विद्यार्थी घेतले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:12+5:302021-03-25T04:29:12+5:30
दापोली : केवळ शिक्षकांचे प्रश्न न मांडता, शिक्षण क्षेत्रातच काम करण्याचे विविध उपक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ...
दापोली : केवळ शिक्षकांचे प्रश्न न मांडता, शिक्षण क्षेत्रातच काम करण्याचे विविध उपक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुणवंत, पण परिस्थिती सबळ नसलेले विद्यार्थी दत्तक घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक स्थितीचा मोठा अडसर असल्याचे लक्षात आल्यानंतर, संघटनेने त्यांना मदत करण्याचे निश्चित केले. त्यातून शालोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी अडीच हजार रुपयांपर्यंत सहकार्य करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांना त्याचे वाटपही सुरू झाले आहे.
संघटनेच्या या उपक्रमासाठीच्या आवाहनाला विनायक वाळंज, मदन रहाटवळ, स्वप्नील परकाळे, अनिल जगताप, रोहिणी लिंगायत, मंगेश कडवईकर, शांताराम शिंदे, राजेंद्र हराळ अशा सभासदांनी प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी अध्यक्ष मुकुंद कासारे यांचे अभिनंदन केले जात आहे.
भविष्यात या उपक्रमाची व्याप्ती वाढवून तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी संघटना आग्रही असल्याचे सरचिटणीस जावेद शेख यांनी सांगितले आहे.
....................
फोटो ओळी
शिक्षक समितीने दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम अदा करण्यास सुरुवात केली आहे.