नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणार : प्रवीण काकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:21+5:302021-08-25T04:36:21+5:30
रत्नागिरी : कोकणातील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या डोंगर दऱ्याखाेऱ्यातील गोरगरीब व दरडी कोसळून नुकसान झालेल्या भागातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य ...
रत्नागिरी : कोकणातील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या डोंगर दऱ्याखाेऱ्यातील गोरगरीब व दरडी कोसळून नुकसान झालेल्या भागातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले.
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट, कऱ्हाड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण तालुक्यातील गाणे, राजवाडी, धनगरवाडी, ओवळी, धामनाडीवाडी, काळकाईवाडी, खिंडवाडी, कळकवणे, रिंगीवाडी, खलिफावाडी, गुरववाडी येथील ९० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे बोलत होते.
याप्रसंगी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज काळे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विजय गोरे, सातारा जिल्हाध्यक्ष राजू लोखंडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष संदीप शेळके, रामचंद्र वरक, प्रा. भाऊराव महानवर, प्रा. भारत मोरे, अमोल लटपटे, संतोष झोरे, नवनाथ झोरे उपस्थित होते .
चिपळूण तालुकाव्यतिरिक्त संगमेश्वर तालुक्यातील आंबवली धनगरवाडीतील २१, लांजा तालुक्यातील कोर्ले येथील १२, रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी धनगरवाडा येथील १३, अहिल्यानगर येथील १५, साईमंदिर धनगरवाड्यातील १७, सापुचेतळे धनगरवाड्यातील २७, नाखरे धनगरवाड्यातील २७, आंबा धनगरवाडयातील २९ मिळून एकूण ११५ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.