विद्यार्थ्यांनी केले लाखाे प्लास्टिक बाटल्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:34 AM2021-08-28T04:34:49+5:302021-08-28T04:34:49+5:30

चिपळूण : महापुराच्या काळात चिपळूणवासीयांची तहान भागविण्यासाठी अनेकांनी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले हाेते. पुराची स्थिती निवळल्यानंतर या बाटल्यांचा खच ...

Students collected millions of plastic bottles | विद्यार्थ्यांनी केले लाखाे प्लास्टिक बाटल्यांचे संकलन

विद्यार्थ्यांनी केले लाखाे प्लास्टिक बाटल्यांचे संकलन

Next

चिपळूण : महापुराच्या काळात चिपळूणवासीयांची तहान भागविण्यासाठी अनेकांनी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले हाेते. पुराची स्थिती निवळल्यानंतर या बाटल्यांचा खच अनेक ठिकाणी दिसू लागल्याने प्लास्टिक बाटल्यांची समस्या निर्माण झाली हाेती. अखेर शहरातील नवकाेंकण एज्युकेशन साेसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘प्लास्टिक बाटलीमुक्त शहर अभियान’ राबवले. या अभियानात लाखाे प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

२२ जुलै रोजी चिपळूण शहरवासीयांनी भयंकर महापुराचा सामना केला. या महापुरामुळे संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्याकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या संपूर्ण शहरात वाटण्यात आल्या. महापुराची परिस्थिती ओसरल्यानंतर या बाटल्या रस्त्यावर आल्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनली होती. या प्लास्टिक बाटल्यांमुळे पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. हे सर्व टाळण्यासाठी या बाटल्या जमा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे आवश्यक होते. याच उद्देशाने डीबीजे महाविद्यालयाने या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमादरम्यान दिनांक १९ ऑगस्ट रोजी चिपळूण शहरातील शंकरवाडी व मुरादपूर परिसरात डीबीजेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बाटल्यांचे संकलन केले. शहरातील गोवळकोट रोड व पेठमाप या परिसरातील प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले. तसेच मुख्य बाजारपेठ, बहादूर शेख नाका ते चिंचनाका व खेंड परिसरात प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले. डीबीजेच्या या अभियानात दररोज साधारणपणे ४० ते ४५ विद्यार्थी सहभागी होत होते. दररोज साधारणपणे १३ ते १४ हजार प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करून सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेकडे या बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आल्या.

हा उपक्रम राबवण्यासाठी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. गवाळे, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. नामदेव तळप, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार पेढामकर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. नियामक समिती सदस्य लियाकत दलवाई यांनी या उपक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या प्लास्टिक बॅगा पुरविल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, प्रा. उदय बामणे, प्रा. डॉ. उत्तम सूर्यवंशी, प्रा. विनायक बांद्रे, प्रा. स्वप्नील साडविलकर यांनी विशेष प्रयत्न केले. या अभियानात सौरभ घोरपडे, प्रतीक जठार, अंकित शर्मा, माहीन मुल्ला, भूषणा पाटणकर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Students collected millions of plastic bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.