आधी विद्यार्थ्यांची मानसिकता जपायला हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:07+5:302021-07-16T04:22:07+5:30

आधी विद्यार्थ्यांची मानसिकता जपायला हवी! कोरोना विषाणूच्या संसर्गाने आपल्यापैकी अनेकांच्या जीवाला घोर लावला आहे. इतकंच नाही तर या जागतिक ...

Students' mentality must be protected first! | आधी विद्यार्थ्यांची मानसिकता जपायला हवी!

आधी विद्यार्थ्यांची मानसिकता जपायला हवी!

Next

आधी विद्यार्थ्यांची मानसिकता जपायला हवी!

कोरोना विषाणूच्या संसर्गाने आपल्यापैकी अनेकांच्या जीवाला घोर लावला आहे. इतकंच नाही तर या जागतिक साथीचा लोकांच्या मनःस्वास्थ्यावर विपरित परिणाम होईल आणि हे आरोग्य संकट निघून गेल्यावरही त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. याचाच अर्थ या परिस्थितीचा लहान मुलांवरही तितकाच परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांवर तर होणारच आहे. शाळेतील मित्र, मैत्रीण, शिक्षक, शाळेचा परिसर आदींपासून दोन वर्षे अलिप्त राहिल्यानंतर त्यांच्या मनावर आघात होणारच आहे. ऑनलाईन शिक्षण आणि त्यामुळे आलेली जीवनशैली ज्या पद्धतीने मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहे, ते बघता याचा मुलांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. त्यासाठी शाळेतले शिक्षण गरजेचे आहे. मुळात शिक्षणाचे गांभीर्य शाळेतील वर्गात दडलेले आहे. शाळेतील वर्ग हा मनाला ताजेतवाने करणारा स्रोत आहे, याचा अनेकदा विसर पडतो. खरंतर आपल्याला पुढील पिढीने अशा पद्धतीने शिकणे व वाढणे अपेक्षित आहे का, हा प्रश्न पालकांनी व धोरणकर्त्यांनी स्वत:ला विचारायला हवा. विद्यार्थ्यांना कोविड उत्तर जगाशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठी पालक, शिक्षक व धोरणकर्त्यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. परंतु, याबाबतीत विद्यार्थ्यांचा फार कोणी विचार करताना दिसत नाही. आज ऑनलाईन शिक्षण व त्यासाठी वाढीव शुल्क आकारले जात असताना शाळा व पालक यांच्यात खटके उडू लागले आहेत. एवढेच नव्हे तर शालेय शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांची गैरहजेरी लावणे, त्यांना विचारात न घेणे, त्यांची अभ्यासिका न तपासणे, त्यांचे म्हणणे ऐकून न घेणे, असे गंभीर प्रकार काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू लागले आहेत. आता पालकांनी शालेय शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना अशी वागणूक मिळत असेल, तर तो घोर अन्यायच म्हणावा लागेल. पण तरीही समाजातील काही वर्ग शाळेच्या बाजूने, तर काही पालकांच्या भूमिकेशी सहमत दिसतो. परंतु, या वादाचा मुलांच्या मानसिकतेवर किती परिणाम होत असेल, याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.

आजही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात नाही. त्यासाठी पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा रेटा लावला जात आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणाचे जसे फायदे दिसताहेत तसेच त्याचे तोटेही जाणवू लागले आहेत. शाळा सुरु असताना खूप अभ्यास होत होता, पण आता तो अभ्यास होत नाही. मोबाईलवर शिकवलेलं समजत नाही, असा अनुभव अनेक विद्यार्थी मांडताना दिसतात. मुळात ऑनलाईन शिक्षण मूठभर सुदैवी मुलांनाच मिळत आहे, कारण आजही बहुतांशी कुटुंबांकडे स्मार्टफोन्स नाहीत. जे उपकरणे वापरत आहेत, त्यांच्या कुटुंबावर वारंवार डेटा पॅक रिचार्ज करण्याचा अतिरिक्त आर्थिक बोजाही पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा ताण येत आहे. याशिवाय अनेक शिक्षक कोणत्याही मार्गाने अभ्यासक्रम पूर्ण करायच्या मागे लागले आहेत. शाळेत दिल्या जाणाऱ्या गृहपाठाहून खूप अधिक काम मुलांना दिले जात आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे काम दिले जात असल्याने शिक्षणाच्या या नवीन युगात केवळ शालेय अध्ययनावर अवलंबून राहणे क्वचितच घडते. नियमित शाळेसह खासगी शिकवण्या घेणे हे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. बाहेर पडण्यावर निर्बंध आल्यामुळे खासगी शिकवण्याही व्हिडीओ आणि ऑडिओ व्याख्यानांच्या माध्यमातून ऑनलाईन घेतल्या जात आहेत. एकंदर स्क्रीनसमोरील कालावधी अचानक वाढल्यामुळे आणि सलग ऑनलाईन वर्गांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अर्थपूर्ण शिक्षणाचा संबंध अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांवर शाळेचे तास पूर्ण करण्याचा बोजा टाकणे, खासगी शिकवण्या, गृहपाठ आणि स्क्रीन्ससमोर दीर्घकाळ घालविण्याशी नक्कीच नाही. डिजिटल शिक्षणासाठी नियम तयार करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली हे प्रोत्साहक आहे. पण हे नियम सरकारी व अनुदानित शाळांसोबत खासगी शाळांमध्येही लागू झाले पाहिजेत.

- संदीप बांद्रे, चिपळूण.

Web Title: Students' mentality must be protected first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.