रत्नागिरीतील विद्यार्थी फाड् फाड् इंग्रजी बोलणार...
By Admin | Published: March 19, 2015 10:04 PM2015-03-19T22:04:19+5:302015-03-19T23:52:19+5:30
नगर परिषद : चाळीस शाळांना इंग्रजी प्रशिक्षणाची सॉफ्टवेअर प्रदान
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नगरपरिषदेच्या २१ व अन्य १९ अशा ४० शाळांमधील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नयेत, यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे इंग्रजी शिक्षणाचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षणाची अद्ययावत सॉफ्टवेअर्स व पुस्तकांचे संच आज पालिकेतील पॉवर प्रेझेंटेशन कार्यक्रमाच्यावेळी त्या शाळांच्या शिक्षक प्रतिनिधींकडे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. त्यामुळे येत्या काही महिन्यात रत्नागिरीतील विद्यार्थीही फाड फाड इंग्रजी बोलतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या शहरातील २२ पैकी २१ शाळा कार्यरत आहेत. शिक्षणातील नवीन तंत्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने या शाळांमध्ये पटसंख्या घसरण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे या शाळांचे आरोग्य सुधारण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेत चार वर्षांपूर्वीच या सर्व शाळांमध्ये संगणक देऊन मुलांना संगणक साक्षर करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आता याच संगणकाच्या सहाय्याने नगरपरिषदेच्या २१ व अन्य १९ प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्याना जागतिक भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व मिळवण्यासाठी हा खास उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नगर परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे आता विद्यार्थी पुन्हा नगर परिषद शाळांकडे आकृष्ट होतील, असा विश्वास पालिका सूत्रांनी व्यक्त केला.
नगरपरिषदेच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता या सॉफ्टवेअरबाबतचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन प्रोजेक्टरदवारे स्क्रीनवर दाखवण्यात आले. यावेळी ४० प्राथमिक शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष मयेकर तसेच उपनगराध्यक्ष संजय साळवी, मुख्याधिकारी एम. बी. खोडके, या प्रकल्पासाठी सॉफ्टवेअर व संच देणारे गुरूकूल संस्थेचे संचालक उमेश नेसवणकर, नगरसेवक उमेश शेट्ये, नगरसेविका राजश्री शिवलकर, शिल्पा सुर्वे, रामेश्वरी धुळप, प्रीती सुर्वे, रशीदा गोदड, पल्लवी राणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)