विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा : शिल्पा पटवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:28+5:302021-04-06T04:30:28+5:30
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल याचा विचार करावा, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या ...
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल याचा विचार करावा, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी केले.
गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे रसायनशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना आणि या क्षेत्रातील संशोधनाची दिशा यासंबंधी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘रिसेंट ट्रेंडस् इन ऑरगॅनिक अँड इन ऑरगॅनिक केमिस्ट्री’ चार दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयाेजन केले आहे. कार्यशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात शिल्पा पटवर्धन बोलत होत्या. कार्यशाळेच्या ऑनलाईन उद्घाटनसाठी रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, वेस्ट इंडिया विभागाच्या डॉ. लक्ष्मी रविशंकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते.
रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका विषद केली. प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील भविष्याचा वेध घेण्यासाठी उपयुक्त ठरतात, असेही सांगितले. डॉ. लक्ष्मी रविशंकर यांनी मार्गदर्शन करताना, आपण निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणते गुण, कौशल्ये आणि ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे याबाबत माहिती दिली.
सूत्रसंचालन राष्ट्रीय कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी देशभरातील विविध राज्यांतील ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी इंडियन इंस्टिट्युट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या जम्मूस्थित संस्थेत कार्यरत डॉ. एस. डी. सावंत यांनी ‘औषध निर्माण क्षेत्रातील संशोधानाच्या संधी’ याविषयी मार्गदर्शन केले.