कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नव्या धोरणाविरोधात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 11:44 AM2022-03-07T11:44:08+5:302022-03-07T11:45:29+5:30
चार वर्ष अभ्यास करून आम्हाला सोळा गुण मिळणार असतील तर आमच्या पदव्या शासनाने परत घ्याव्यात,
दापोली : कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी तयार करण्यात आलेले नवे अभ्यासक्रम धोरण कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मारक असल्याच्या निषेधार्थ दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटना तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी या नव्या अभ्यासक्रम धोरणाचा निषेध केला.
दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयाकडे प्रमुख ११ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. परीक्षेतील गुणांकन परीक्षेतील प्रश्न व कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी इतर संलग्न पदवीधर यांच्यावर अन्याय होत आहे. या बाबत घेतलेला निर्णय अभ्यासक्रम मागे घ्यावा नवीन अभ्यासक्रमात कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी आवश्यक बाबींचा समावेश करून अभ्यासक्रम तयार करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी शेकडो विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत.
जुन्या कृषी धोरणानुसार कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना २८० गुणांचे मानांकन मिळत होते. परंतु शासनाच्या नवीन कृषी धोरणानुसार त्यांचे गुण २८० वरून १६ गुण करण्यात आले आहेत. त्यामुळे कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे. चार वर्ष अभ्यास करून आम्हाला सोळा गुण मिळणार असतील तर आमच्या पदव्या शासनाने परत घ्याव्यात, अशी उद्विग्न प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.