नववीच्या नापास विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा--: शिक्षण विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:15 AM2019-04-20T11:15:30+5:302019-04-20T11:18:46+5:30
दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते
रत्नागिरी : दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते किंवा अभ्यासात मागे पडणाºया विद्यार्थ्यांना नापास करण्यात येते. शिक्षण विभागाने नववीच्या निकालाकडे लक्ष केंद्रीत करून नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची सूचना केली आहे.
आतापर्यंत नववीच्या निकालाची माहिती शिक्षण विभागाकडून घेण्यात येत नव्हती. मात्र, यापुढे माहिती घेतली जाणार आहे. शासनाने विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण ठरविले होते, या धोरणात बदल केलेला नाही. त्यामुळे अभ्यासात कमी प्रगती असणाºया विद्यार्थ्यांवर नववीत गेल्यानंतर नापास होण्याचा कठीण प्रसंग ओढवतो..
अभ्यासात फारशी प्रगती नसलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याकडे शाळाचा कल अधिक असतो. इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा व शाळा निकालाबाबत सर्वाेच्च शिखरावर असावी, याकरिता इयत्ता नववीमध्ये अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना नापास केले जाते. अनेक शाळांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त प्रमाणात असतेच असते. आठवीपर्यंत पास व निकाल नाही. नापास होणाºया विद्यार्थ्यांना शाळा बदलण्याची सूचना केली जाते अथवा त्यांचा १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसविण्यात येत असते.
गतवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नववीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश वर्षभरापूर्वीच शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडून शाळांना बजावण्यात आले होते. मात्र, या आदेशाची शाळांकडून गांभीर्याने अंमलबजावणी न करता ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे कामकाज सुरू आहे. नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा घेण्याबाबत शाळांना पुन्हा सूचना करण्यात आल्या असून, सूचनांची अंमलबजावणी शाळांनी प्राधान्याने करणे आवश्यक आहे.