आधी अभ्यास करा, मगच दबाव आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:33 AM2021-04-02T04:33:21+5:302021-04-02T04:33:21+5:30
रत्नागिरी : काही नेते बाहेरून येऊन पर्ससीन मच्छीमारांना उद्ध्वस्त करायला निघालेत. त्यामुळे वेळ पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयासमोर ...
रत्नागिरी : काही नेते बाहेरून येऊन पर्ससीन मच्छीमारांना उद्ध्वस्त करायला निघालेत. त्यामुळे वेळ पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याला घाबरणार नाही. वेळ पडल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा पर्ससीन मच्छीमार नेते नासीर वाघू यांनी पत्रकार परिषदेत दिला. पर्ससीननेटचे आणि छोटे मच्छीमार यांना घेऊन चर्चा करावी, त्याचा अभ्यास करावा, त्यानंतर त्यांनी वरिष्ठ स्तरावरून दबाव आणावा, असा टाेला वाघू यांनी आमदार नितेश राणे यांना लगावला.
पर्ससीन नेट मासेमारी बंद करण्यावरून मच्छीमारांमध्ये वादळ निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन पर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय अनेक मच्छीमारांनी उभा केला आहे. आधीच मासेमारी व्यवसाय देशोधडीला लागलेेला असताना काही नेतेमंडळी तो उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहेत, असाही आरोप पर्ससीननेट मच्छीमारांकडून करण्यात आला. यावेळी वाघू यांनी पारंपरिक मच्छीमार रत्नागिरीत किती आहेत, हे दाखवून द्यावे, असेही सांगितले. टप्प्याटप्प्याने उपोषणे करणे ही नौटंकी असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, छोटा मच्छीमार, मोठा मच्छीमार या सर्वांचे पोट भरायला पाहिजे. मोठ्या मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात मासे मिळाल्यानंतर काही लोकांमध्ये पाेटशूळ उठते. त्यामुळे हर्णै, दापोलीतील तसेच सिंधुदुर्गातील काही राजकीय नेते आपला मतदारसंघ कसा ताब्यात राहील, यासाठी प्रयत्न करीत आहेत.
चौकट-
पर्ससीन नेट मासेमारीवर अनेक लोकांना रोजगार मिळत आहे. पर्ससीन नेटने मिळणाऱ्या मासेमारीतून मोठ्या प्रमाणात देशाला परकीय चलन मिळते. पर्ससीने मासेमारीमुळे मोठी इंडस्ट्री चालते. ही मासेमारी बंद झाल्यास मासा बघायला मिळणार नाही. छोट्या मच्छीमारांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे आणण्याची क्षमताच नाही. हा मासा गुजरात, गोवा, केरळमधील मच्छीमार येऊन हे मासे मारून नेणार. त्यामुळे आमच्या लोकांनी फक्त तोंडे बघत राहावे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक नेते बशीर मुर्तुझा यांनी उपस्थित केला.
चौकट-
मच्छीमारांमध्ये एकी नसल्याने पारंपरिक शब्दाचा अधिकाऱ्यांकडून बागुलबुवा करण्यात आला आहे, असा आरोप करून पर्ससीन नेट मच्छीमारांचे कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद पिलणकर यांनी करून पारंपरिक मच्छिमार जिल्ह्यात आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला. मत्स्य खात्याने दिलेेल्या माहितीच्या अधिकारात लेखी माहितीनुसार जिल्ह्यात पारंपरिक मासेमारी करणाऱ्या एकाही नौकेची नोंदणी नसल्याचे त्यांनी पुराव्यासह सांगितले.