उपप्रादेशिक कार्यालयाच्या तिजोरीत २६ कोटी
By admin | Published: December 24, 2014 11:21 PM2014-12-24T23:21:58+5:302014-12-25T00:05:19+5:30
वायुवेग पथकाची कामगिरी : नऊ महिन्यात तब्बल ३७५९ गुन्ह्यांची नोंद
रत्नागिरी : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत केवळ वाहनांची नोंदणी आणि वाहन मालक, चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक स्वरुपातील कारवाईच्या रुपाने २६.१० कोटी रुपये महसूल जमा ेकेला आहे. या कालावधीत तब्बल ३,७५९ गुन्हे नोंदविले आहेत.
परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत रस्त्यावर जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करुन रस्ता सुरक्षाविषयक बाबी तपासण्यात येतात. पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत विविध तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालक -चालकांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंदवून २४.६१ लाख रुपये दंड, मोटार वाहन कर १३९.८० लाख रुपये असे एकूण १६४ लाख ४१ हजार रुपये वसूल केले आहेत.
यामध्ये वाहनांचा फिटनेस, परवाना, इन्शुरन्स, ओव्हरलोड वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेट, रिफ्लेक्टर व अन्य गुन्हे असे एकूण ३ हजार ७६९ एवढे गुन्हे नोंदविले आहेत.
परिवहन कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या शिकाऊ परवान्यासाठी संगणकीय चाचणी घेण्यात येते. वाहतुकीच्या नियमांची, वाहतूक चिन्हांची व कायद्यातील तरतुदींचे ज्ञान असेल अशाच उमेदवारांना शिकाऊ परवाना दिला जातो.
याचबरोबर परिवहन संवर्गातील वाहनांची काटेकोरपणे तपासणी करुन ज्यामध्ये वाहनाच्या ब्रेकची तपासणी करणे, हेडलाईटची तपासणी करणे व अन्य सुरक्षाविषयक बाबींची तपासणी करुन ज्यामध्ये वाहनाच्या ब्रेकची तपासणी करणे, हेडलाईटची तपासणी करणे व अन्य सुरक्षाविषयक बाबींची तपासणी करुनच वाहनांना योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यात येत आहे.
ओव्हरलोड वाहतुकीविरुध्द ११२ दोषी वाहनांवर कारवाई करून एकूण १३.२२ लाख रुपये दंड वसूल केला आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२७ वाहनांवर कारवाई करुन ६.०१ लाख रुपये वसूल करण्यात आले.
रस्ता सुरक्षितेबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यालयाकडून जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये ओव्हरलोड तपासणी, अवैध प्रवासी वाहतूक तपासणी रिफ्लेक्टर, हेल्मेट, हेडलाईट तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मालवाहू व प्रवासी वाहनांना लाल परावर्तक पट्टी लावण्याची मोहीम व रस्ता सुरक्षा विषयक जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, असे रत्नागिरीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. वाहनांचा कर वेळेवर भरावा तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहने चालवावी. अवैध प्रवासी, ओव्हरलोड वाहतूक करु नये अन्यथा आपली वाहने पोलीस स्टेशनमध्ये अडकवून ठेवण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान झालेली वाहन नोंदणी
वाहनेसंख्या
दुचाकी९,१४७
कार, जीप१,४१७
टॅक्सी१३
आॅटोरिक्षा१,४५१
बसेस३९
अॅम्ब्युलन्स११
ट्रक- टँकर१७०
मालवाहू८६३
ट्रॅक्टर१८
जेसीबी/क्रेन/लोडर१९
एकूण१२,९६८