आभाळाएवढे दु:ख तरी देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान, मोरवणेतील ढगळे कुटुंबाने वाहून घेतले देशसेवेला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 02:24 PM2023-04-03T14:24:37+5:302023-04-03T14:24:52+5:30
सुभेदार अजय ढगळे हे भारत-चीन सीमेवर रेकी करत असताना झालेल्या भूस्खलनात शहीद झाले
संदीप बांद्रे
चिपळूण : तालुक्यातील मोरवणे ढगळेवाडी येथील ढगळे कुटुंब गेली कित्येक वर्षे भारतीय सैन्यात देशाची सेवा करत आहे. वडील, भाऊ, चुलते आणि पुतण्या सर्वांनी देशाची सेवा केली. आता तर तरुण अजय ढगळे देशासाठी शहीद झाले. घरातील कर्ता तरुण अचानक निघून गेल्याचे आभाळाएवढे दुःख असतानाही देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान या कुटुंबाला आणि मोरवणे गावाला आहे. ढगळे कुटुंबाची ही देशसेवा इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद करण्यासारखी ठरणार आहे.
मोरवणे ढगळेवाडीचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे भारत - चीन सीमेवर रस्ता करण्यासाठी रेकी करत असताना झालेल्या भूस्खलनात शहीद झाले. प्रत्यक्षात अजय ढगळे हे १९९० मध्ये भारतीय सैन्यदलात सामील झाले. चिपळूण येथील माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात राहून त्यांनी युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर अकरावीपर्यंत डीबीजे महाविद्यालयात शिक्षण झाले. बॉम्बे इंजिनिअर ग्रुप, पुणे येथे शिपाई पदावर कार्यरत असताना त्यांनी सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. १०८ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कारगिल युद्धात टायगर हिल जिंकणाऱ्या तुकडीचा ते हिस्सा राहिले होते.
शहीद अजय ढगळे यांचे वडील शांताराम ढगळे हेही भारतीय सैन्यदलातून निवृत्त झाले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. चुलते सीताराम ढगळे तसेच भाऊ भगवान ढगळे यांनी भारतीय सैन्यदलात सेवा बजावली आहे. सध्या पुतण्या भरत ढगळे देशसेवेत आहे. संपूर्ण ढगळे कुटुंबाने देशसेवेला वाहून घेतलेले आहे. त्यांच्या या देशसेवेचा अभिमान असल्याचे माेरवणेतील ग्रामस्थांनी सांगितले.
बढती मिळणार हाेती
ऑपरेशन पराक्रम मोहीम तसेच सुदानमधील शांती सेनेचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. भारतीय सैन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या (CIJW) कोर्समध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते. लवकरच त्यांची मेजर या पदावर बढती होणार होती. भारतीय सैन्यात एक जिगरबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईत बोरिवली येथे आपल्या कुटुंबाबरोबर वास्तव्यास असलेले अजय ढगळे हे प्रशिक्षण काळ पूर्ण करून काही दिवसांपूर्वीच भारत - चीन सीमेवर रुजू झाले होते.