शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी अर्थसाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:00+5:302021-04-08T04:31:00+5:30
चिपळूण : येत्या पाच वर्षांत ५ हजार शेतकरी सभासदांना शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देता यावी यासाठी येथील चिपळूण नागरी ...
चिपळूण : येत्या पाच वर्षांत ५ हजार शेतकरी सभासदांना शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देता यावी यासाठी येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. तसेच येत्या ५ वर्षांत २५ हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठीचा उपक्रमही हाती घेतला जाणार आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली. मार्च २०२१ अखेर संस्थेने ३५ कोटी रुपये व्यावसायिक नफा मिळविला असून, १४७२ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे.
या संस्थेची मार्च २०२१ अखेर सभासद संख्या १ लाख २४ हजार ९७३, भाग भांडवल ५८ कोटी ०४ लाख रुपये, तर एकूण स्वनिधी १०३ कोटी ९२ लाख रुपये आहे. फक्त २७ वर्षांच्या कालखंडात सभासद संख्या, भाग भांडवल व स्वनिधी वाढीमध्ये राज्यातील काही निवडक संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होतो. संस्थेच्या ठेवी ८०२ कोटी ५८ लाख, एकूण कर्जव्यवहार ६६९ कोटी ४९ लाख रुपये आहे. त्यापैकी सोनेतारण कर्ज २५२ कोटी ४४ लाख तर एकूण प्लेज लोन २८८ कोटी ०७ लाख रुपये आहे.
संस्थेचा एकूण व्यवसाय १४७२ कोटींचा असून तो २०२५ पर्यंत २५०० कोटींचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण असतानाही संस्थेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा क्षमतेचे सातत्य राखले आहे.
या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध व्हावा यासाठी संस्थेने पुढील ५ वर्षांत किमान ५ हजार शेतकऱ्यांना शेतीपूरक दुग्ध व्यवसायाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय स्वयंरोजगारासाठी पुढील ५ वर्षांत २५ हजार बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काम चालू आहे. ‘आपली माणसे - आपली संस्था’ हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यात सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, संचालक, समन्वयक व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी आभार मानले आहेत.