पावस येथील नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात यश, तत्कालीक कारणातून खून, एकाला अटक
By अरुण आडिवरेकर | Published: May 3, 2024 10:46 PM2024-05-03T22:46:15+5:302024-05-03T22:46:36+5:30
या गुन्ह्याचा तपास रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर हे करत होते. या खूनप्रकरणातील आराेपीचा शाेध घेण्याची सूचना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली हाेती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने या घटनास्थळाची पाहणी केली हाेती.
रत्नागिरी : तालुक्यातील पावस परिसरातील गाेळप मुसलमानवाडी येथे दाेन नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या दाेन भावांच्या खूनप्रकरणी पाेलिसांनी गाेळप येथे आंबा बागेत काम करणाऱ्या एक गुराख्याला शुक्रवारी अटक केली आहे. सरणकुमार उर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा (५८, रा. टिकापुर, जि. कैलाली, नेपाळ) असे त्याचे नाव आहे. त्याने तत्कालीक कारणातून हा खून केल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे.
खडकबहादुर बलराम थापा क्षेत्री (७२), भक्तबहादुर बलराम थापा क्षेत्री (६७, दाेघेही रा. लम्की चुहा, चौरीपुर, कैलाली, नेपाळ) या दाेघांचा २९ एप्रिल राेजी मध्यरात्री खून करण्यात आला हाेता. ३० एप्रिल राेजी सकाळी हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी आंबा बागायतदार मालक मुसद्दिक मुराद मुकादम यांनी फिर्याद दिली हाेती. त्यानुसार पूर्णगड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
या गुन्ह्याचा तपास रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर हे करत होते. या खूनप्रकरणातील आराेपीचा शाेध घेण्याची सूचना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली हाेती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने या घटनास्थळाची पाहणी केली हाेती.
हा खून माहितगार व्यक्तीने केल्याची खात्री झाल्यानंतर आजूबाजूच्या नेपाळी गुरख्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चाैकशीत सरणकुमार ऊर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा याने या दाेघांचा खून केल्याचे समाेर आले. त्याने तत्कालीक कारणावरुन जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, योगेश खोंडे, यांच्यासह पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक धायरकर यांनी ही कामगिरी केली. तसेच सहायक पाेलिस फाैजदार पांडुरंग गोरे, पाेलिस हवालदार सुभाष भागणे, विनोद कदम, शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, बाळू पालकर, सागर साळवी, अमित कदम, योगेश नार्वेकर, सत्यजित दरेकर, योगेश शेट्ये, दीपराज पाटील, गणेश सावंत, प्रवीण खांबे, पोलिस नाईक दत्तात्रय कांबळे, अतुल कांबळे यांचा या कारवाईत सहभाग हाेता.