निबंध स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:35+5:302021-06-16T04:41:35+5:30
गुहागर : बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. कास्ट्राईब ...
गुहागर : बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तालुक्यातील कुडली येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक ३ माटलवाडीची विद्यार्थिनी समिरा ठोंबरे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
लसीकरणाला प्रतिसाद
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा उत्तम उपाय असल्याने नजीकच्या मजगाव येथील ग्रामपंचायतीने लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या अंतर्गत ४५ वर्षांवरील १०० ग्रामस्थांना कोविशिल्ड लस देण्यात आली. सकाळी १० वाजल्यापासून दुपारपर्यंत हे शिबिर सुरु होते.
झुडपांचा त्रास
रत्नागिरी : तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आता रस्त्यावर झुडपे वाढू लागली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अडचणीचे झाले आहे. सागरी महामार्गावरील गणपतीपुळे ते रत्नागिरी तसेच नेवरे ते बसणी या मार्गावर अनेक ठिकाणी आता पावसामुळे रस्त्यावर झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहेत.
शेतकऱ्यांसमोर अडचणी
आवाशी : सध्या लॉकडाऊन शिथील झाले असले तरी अजूनही पुरेशा प्रमाणात एस. टी. गाड्या सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सध्या शेतीची कामे सुरु झाल्याने ग्रामीण भागातून शहरात जाऊन शेतीची अवजारे तसेच इतर साहित्य आणावे लागत असल्याने वाहतूक सुविधेअभावी अडचणीचे झाले आहे.
रहदारीत वाढ
रत्नागिरी : जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ९ ते ४ यावेळेत अत्यावश्यक सेवेशी निगडीत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत रहदारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते.