गणपतीपुळे समुद्रात बुडताना पुण्याच्या पर्यटकाला वाचविण्यात यश
By मनोज मुळ्ये | Published: August 31, 2022 06:08 PM2022-08-31T18:08:12+5:302022-08-31T18:09:29+5:30
पोहता पोहता खोल समुद्राच्या पाण्यात ओढला जाऊन बुडू लागला. सागररक्षक दलाचे सदस्य शरद अशोक मयेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिंग बोये घेऊन समुद्रात उडी घेतली आणि गुलशनला समुद्राबाहेर काढले.
संजय रामाणी
गणपतीपुळे : गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे आलेल्या पुण्यातील एका पर्यटकाला समुद्रात बुडताना वाचवण्यात आले. सागर रक्षक दलाच्या सदस्याने त्याचा जीव वाचवला. गुलशन सुधाकर राठोड (२८) असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील पानोला (माहुर) येथील असून, सध्या तो पुण्याती चाकण येथे एका कंपनीत काम करतो.
गणपतीपुळे येथील सागर रक्षक दलाचा सदस्य शरद उर्फ शेऱ्या मयेकर (रा. मालगुंड- भंडारवाडा) यांच्या धाडसामुळे गुलशनचा जीव वाचला. मयेकर यांना गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी अमेय केदार, मिथुन माने व अन्य कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य मिळाले. गुलशनला गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
पुणे चाकण येथील बेलफी वायरिंग हायर्नेस कंपनीचे एकूण वीस तरुण बुधवारी गणपतीपुळे येथे आले होते. सकाळी ११ वाजता ते गणपतीपुळे येथे दाखल झाले. देवदर्शनानंतर ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुलशन पोहता पोहता खोल समुद्राच्या पाण्यात ओढला जाऊन बुडू लागला. त्याच्या सहकारी मित्रांनी आरडाओरडा केला. तेव्हा गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत असलेले सागररक्षक दलाचे सदस्य शरद अशोक मयेकर (४१, मालगुंड भंडारवाडा) यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिंग बोये घेऊन समुद्रात उडी घेतली आणि गुलशनला समुद्राबाहेर काढले.
त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तत्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय वालिया यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला सुस्थितीत आणले.
धाडसी कामगिरी
बुधवारी गणेश चतुर्थी निमित्त गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सागरी जीवरक्षकांना सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा एकही जीवरक्षक नव्हता. मात्र गणपतीपुळे सागररक्षक दलाचा सदस्य शरद मयेकर देदेवदूतासारखे धावून आले. त्याच्या या धाडसाबद्दल जयगड पोलीस ठाण्याच्यावतीने गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्रामध्ये रत्नागिरीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जयगडचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, कॉन्स्टेबल मधुकर सरगर, प्रशांत लोहळकर, सागर गिरीगोसावी, महिला कॉन्स्टेबल वंदना लाड आदींसह जयगड पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.