जिल्ह्यातील ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:21+5:302021-05-21T04:32:21+5:30
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र ...
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र सोमवारपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आतापर्यंत ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे. अद्याप ६३ गावे अंधारात असून, तेथील काम युद्धपातळीवर केले जात आहे.
महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची टीम शहरी तसेच ग्रामीण भागात कार्यरत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी काम करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ५५ उपकेंद्रे सुरू आहेत. ७,५४८ ट्रान्सफाॅर्मरपैकी ७,०१७ ट्रान्सफाॅर्मर सुरू झाले असून, ५३१ ट्रान्सफाॅर्मर अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील पाच लाख चार हजार ९२१ ग्राहकांपैकी पाच लाख १७ हजार ५६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला आहे. ३७ हजार ८६५ ग्राहक मात्र अद्याप अंधारात आहेत.
वादळामुळे उच्चदाबाचे एकूण ४८५ विजेचे खांब पडले होते. पैकी १२५ खांब आतापर्यंत उभे करण्यात आले असले तरी ३६० खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. लघुदाबाचे एकूण १२३३ खांब पडले होते. पैकी १३३ खांब उभे करण्यात आले असले तरी ११०० खांब अद्याप उभे करणे बाकी आहे.
महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे, कैलास लवेकर हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र उर्वरित वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.