४० वर्षाच्या वैद्यकीय सेवेनंतर कोकणच्या लाल मातीत केली ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 04:43 PM2019-01-02T16:43:44+5:302019-01-02T16:48:10+5:30
यशकथा : आंब्याला पर्याय म्हणून त्यांनी लाल मातीत ड्रॅगन फ्रूटची बाग फुलविली असून, चांगले अर्थार्जन ते मिळवित आहेत.
- मेहरून नाकाडे ( रत्नागिरी)
कोकणच्या लाल मातीत कोणत्याही प्रकारची पिके घेतली जाऊ शकतात, हे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड गावचे डॉ. श्रीराम फडके यांनी ४० वर्षांच्या वैद्यकीय सेवेनंतर यशस्वी शेती करणे सुरू केले आहे. आंब्याला पर्याय म्हणून त्यांनी लाल मातीत ड्रॅगन फ्रूटची बाग फुलविली असून, चांगले अर्थार्जन ते मिळवित आहेत.
आंबा पीक हवामानावर अवलंबून असून, ते दिवसेंदिवस खर्चिक बनले आहे. त्याला पर्याय म्हणून त्यांनी दोन एकर क्षेत्रावर तांबड्या जातीच्या ड्रॅगनफ्रूटची लागवड केली आहे. वैद्यकीयदृष्ट्या ड्रगनफ्रूट महत्त्वपूर्ण असून, त्याला बाजारात मागणीही चांगली असते. कोकणच्या लाल मातीत चांगल्या दर्जाचे ड्रॅगनफ्रूट पिकविता येते, हे सिद्धदेखील केले आहे.
वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी शेतीकडे लक्ष देणे सुरू केले. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे त्यांचा विशेष कल आहे. गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्काचा वापर ते करीत आहेत. डॉ. श्रीराम फडके यांच्यातील शेतीची आवड त्यांचे चिरंजीव डॉ. अनिरुद्ध फडके यांच्यामध्येही निर्माण झाली आहे.
तांबडा ड्रॅगनफ्रूट कोकणच्या मातीत होऊ शकतो, याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी रायगड येथून रोपे आणली. पूर्णगड येथील त्यांच्या कातळ जमिनीवर खड्डे खोदून दीडशे सिमेंट पोल टाकले आहेत. कातळ जमीन असल्यामुळे ३० ट्रॅक्टर माती टाकून एका सिमेंटभोवती चार रोपे याप्रमाणे लागवड केली आहे. सुरुवातीला अर्धा एकरवर लागवड केली होती. मात्र, आता त्यांनी अजून दीड एकर क्षेत्र वाढविले आहे. साधारणत: रोप लावल्यानंतर वर्षभर त्याची वाढ सुरू असते. दुसऱ्या वर्षी साधारणत: एका पोलाभोवती असणाऱ्या चार रोपांना किलोभर ड्रॅगनफ्रूट लागते. तिसऱ्या वर्षापासून मात्र ८ ते १० किलो एका पोलमागे उत्पन्न अपेक्षित असून, भविष्यात उत्पन्न वाढते. झाडाचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असल्याने लागवडीनंतर फारसा त्रास शेतकऱ्यांना होत नाही.
ड्रॅगन हे निवडुंग प्रकारातील झाड असून, कणखर आहे. त्याला विशेष रोगराई नाही, शिवाय वानरांचा अजिबात त्रास नाही. कमी पाण्यावर होणाऱ्या या फळाचे लागवडीपासून तिसऱ्या वर्षापासून उत्पादन सुरू होते. त्यामुळे सिमेंट पोल व त्याभोवती लावाव्या लागणाऱ्या रिंगा याचाच खर्च वाढतो; परंतु सरासरी शंभर रुपये किलो दराने विक्री होत असल्यामुळे या फळांमुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची आर्थिकप्राप्ती तिसऱ्या वर्षापासून होऊ शकते. यलो, व्हाईट, रेड असे तीन प्रकार असून, रेड प्रकाराला दर चांगला लाभतो. साधारणत: एका झाडाला पाचवेळा कळ्या येतात. मात्र, त्यावेळी जास्त पाऊस व ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान चालत नाही. कोकणात तेवढे तापमान नाही. त्यामुळे हे पीक सहज कुठेही होऊ शकते. कळ्या आल्यानंतर महिना ते सव्वा महिन्यात फळ तयार होते. यावर्षी डॉ. फडके यांनी रत्नागिरी व पुणे बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटची विक्री केली.