आंबा बागेत भाजीपाला आंतरपीक प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:33+5:302021-04-08T04:31:33+5:30
............................................... स्वत:च्या आंबा कलमांचे उत्पादन घेत असतानाच भाडे तत्त्वावर किंवा कराराने कलमबागा घेऊन उत्पन्न घेणारे बागायतदारही अधिक आहेत. ...
...............................................
स्वत:च्या आंबा कलमांचे उत्पादन घेत असतानाच भाडे तत्त्वावर किंवा कराराने कलमबागा घेऊन उत्पन्न घेणारे बागायतदारही अधिक आहेत. प्रकाश आंबेकर यांनी कलम बागेत पालेभाज्यांसह, कलिंगड, भेंडी, वांगी, वाली, कोथींबीर, हिरवी मिरची पिकाची आंतर लागवड करून उत्पन्न घेतले आहे. विक्रीसाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले नाहीत. गावात तसेच आसपासच्या गावातच विक्री केली.
बहुधा वर्ष किंवा दोन ते तीन वर्षाचा करार केला जातो. बहुतांश बागायतदार आंबा उत्पादन घेण्यातच समाधान मानतात. मात्र फणसवळे येथील प्रकाश आंबेकर यांनी वळके येथील आंबा कलमांची बाग आंबा काढणीसाठी घेतली होती. कलम बागेत विहीर असल्याने पाण्याचा प्रश्न नव्हता. माकडे, वन्य प्राण्यांपासून बागायतीचे संरक्षण करण्यासाठी डिसेंबरपासून राखणी ठेवावे लागतात. केवळ आंबा बागायतीचे संरक्षण करण्याऐवजी भाजीपाला उत्पादन घेऊन पीक संरक्षणासाठी राखणीचा उपयोग केला जाऊ शकतो.
मजुरांना मिळाले काम
प्रकाश आंबेकर हे शहरातील एका कंपनीला मजूर पुरविण्याचे काम करतात. काही वेळा मजुरांना काम नसते. त्यासाठी त्यांनी स्वत: आंबा व्यवसाय करीत असतानाच बागेत आंतरपिकातून उत्पन्न वाढीसाठी लागवड केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वीही झाला. यामुळे पडीक जमीन लागवडीखाली आली. शिवाय कंपनीत काम नसते, तेव्हा आंबेकर यांच्या शेतात मजुरांना काम उपलब्ध होत आहे. बागायतीमध्ये आंतरपीक संकल्पना फायदेशीर ठरत आहे.