एक दिवसाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया, मेंदूशी संबंधित शस्त्रक्रियेने वाचवले बाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 04:32 PM2019-07-08T16:32:09+5:302019-07-08T16:37:42+5:30
कवटीला असलेल्या भोकामुळे मेंदूचा काही भाग बाहेर आलेला आणि त्याला पाण्याचे आवरण. बाळ फक्त एक दिवसाचं. डोक्याच्या आकारापेक्षा मोठा गोळा डोक्याच्या मागच्या बाजूने तयार झालेला. मुलाला जगवायचं तर तो गोळा काढणे गरजेचे. एक दिवसाचं मूल असल्याने त्यात खूप गुंतागुंत होती. पण डॉ. श्रीविजय फडके यांनी आपल्या वरिष्ठांच्या पाठबळावर आणि एका मोठ्या टीमसह या गुंतागुंतीतून बाळाला सोडवले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली अन् बाळ वाचलं.
मनोज मुळये
रत्नागिरी : कवटीला असलेल्या भोकामुळे मेंदूचा काही भाग बाहेर आलेला आणि त्याला पाण्याचे आवरण. बाळ फक्त एक दिवसाचं. डोक्याच्या आकारापेक्षा मोठा गोळा डोक्याच्या मागच्या बाजूने तयार झालेला. मुलाला जगवायचं तर तो गोळा काढणे गरजेचे. एक दिवसाचं मूल असल्याने त्यात खूप गुंतागुंत होती. पण डॉ. श्रीविजय फडके यांनी आपल्या वरिष्ठांच्या पाठबळावर आणि एका मोठ्या टीमसह या गुंतागुंतीतून बाळाला सोडवले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली अन् बाळ वाचलं.
रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली आहे. जिल्हा रूग्णालयात एक महिला प्रसुत झाली. तिच्या बाळाच्या कवटीच्या मागच्या बाजूला एक भोक होते. एका दिवसात या भोकातून मेंदूचा काही भाग बाहेर आला. त्याच्याभोवती पाण्याचे आवरण होते. वैद्यकीय परिभाषेत त्याला एन्सिफॅलोसिल मेनिंगोसिल म्हणतात.
बाळाची ही स्थिती लक्षात घेता, शस्त्रक्रिया हा एकच पर्याय असतो. त्याखेरीज कोणतेही उपाय हे बाळाला त्रास देणारेच ठरतात. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिलेल्या परवानगीमुळे आणि नैतिक पाठबळामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, असे रूग्णालयाचे न्यूरो सर्जन डॉ. श्रीविजय फडके यांनी लोकमतला सांगितले.
अशा शस्त्रक्रियांमध्ये ७० टक्के धोका असतो. २० ते ३० टक्केच मुले वाचतात. मात्र, तो एकच पर्याय होता. अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यातील पहिला एक तास त्या गाठीमध्ये जमा झालेले पाणी हळूहळू काढण्यात गेला. मेंदूचे निकामी झालेले भाग बाजूला करणे आणि उपयोगी भाग परत कवटीमध्ये सुरक्षित ठेवणे, यात जास्त काटेकोर काम करावे लागले. बाळाच्या शरीराचे तापमान कायम राहावे, यासाठी शस्त्रक्रियेदरम्यान तेथील ए. सी. पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. तब्बल अडीच तासांनी शस्त्रक्रिया संपली. बुधवारी ही शस्त्रक्रिया झाली. आता दोन दिवसांनी बाळ व्यवस्थित आहे.
बास.. बाळाने श्वास घ्यावा!
ही शस्त्रक्रिया संपल्यानंतर नेमके काय मनात आले, हे सांगताना डॉ. फडके म्हणाले की, एवढंच मनात आले की, भूल उतरेल तेव्हा बाळाने श्वास घ्यावा. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आनंद असतोच. पण रूग्ण नॉर्मल होईपर्यंत हायसे वाटत नाही. इथे तर एक दिवसाच्या बाळावरची शस्त्रक्रिया होती. त्यामुळे त्याने श्वास घ्यावा हेच अपेक्षित होतं.
सगळं काही छोटं-छोटं
शस्त्रक्रिया बाळाची असल्याने त्याच्यासाठी औषधाचे डोस खूप छोटे करावे लागले. आवश्यक साधने छोटी वापरावी लागली. मोठ्या लोकांना १० ते २० मि.मी.ची सुई वापरली जाते. या बाळासाठी १ मि.मी.ची सुई वापरावी लागली. छोट्या मुलाला जास्त वेळ भूल देता येत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया जलदगतीने आणि तरीही नाजूकपणे करणे आवश्यक होते. शस्त्रक्रियेदरम्यान रक्त वाया जाऊ न देणे महत्त्वाचे होते. ताण या गोष्टीचा होता. प्रत्यक्षात शस्त्रक्रिया करताना ४० मि.ली. इतकंच रक्त वाया गेल्याचे डॉ. फडके यांनी सांगितले.
टीमवर्कमुळेच साध्य झाले
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांनी दिलेला पाठिंबा, भूलतज्ज्ञ डॉ. दांडेकर यांनी केलेले अप्रतिम काम, बालरोगतज्ज्ञांसह सर्वांनीच केलेले टीमवर्क यामुळेच एक दिवसाच्या बाळावरील ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली, असे ते म्हणाले.