रायपाटण येथील साकव धोकादायक
By admin | Published: August 26, 2014 09:09 PM2014-08-26T21:09:17+5:302014-08-26T21:50:13+5:30
दळणवळणातील त्रुटी : चार गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
राजापूर : रायपाटण येथील बागवाडीसह अन्य चार वाड्यांना एकमेव असलेल्या लोखंडी साकवाचे खांब गंजल्यामुळे तो मोडून पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे येथील जनतेचा तालुक्याशी व अन्य गावांशी असणारा संपर्क धोक्यात आला आहे. या लोखंडी साकवाचे काम त्वरित करावे, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील अर्जुना नदीवर सुमारे २५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमार्फत साकव बांधण्यात आला होता. त्याचा फायदा गावातील नदीपलीकडील बागवाडी, कदमवाडी, बौद्धवाडी व खाड्येवाडी येथील ग्रामस्थांना होत होता. मागील काही वर्षे या साकवाची देखभाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने न केल्यामुळे या साकवाला वापरण्यात आलेले लोखंडी खांब आता पर्ण गंजून गेले आहेत. त्यामुळे या साकवावरुन ये-जा करताना जीव मुठीत घेऊनच येथील नागरिकांना यावे लागते.
गेली अनेक वर्षे या साकवाची डागडुजी न केल्यामुळे आता हा साकव कोसळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थांनी साकव दुरुस्त करण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. मात्र, या मागणीकडे जिल्हा परिषद दुर्लक्ष करत असल्यामुळे पावसाळ्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायपाटण येथील या चार वाड्यांना गावात येण्यासाठी साकवाचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांसाठी हा साकव मृत्यूचा सापळा ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या चार वाड्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ता बनवण्याचे काम गेली दोन वर्षे सुरु असले तरी अर्जुना नदीवर वाहतुकीच्या पुलाबाबत शासकीय स्तरावरुन अद्याप मंजुरी न मिळाल्याने या रस्त्याचा नदीपलीकडील नागरिकांना पुलाचा काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे हा लोखंडी साकव हाच एकमेव मार्ग त्या सर्वांसाठी सोयीचा आहे. त्याची तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील रायपाटण येथे असलेला हा साकव धोकादायक बनल्याने चिंता व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)