अशी ही रत्नागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:08+5:302021-09-27T04:34:08+5:30

‘सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन’ नंदनवन म्हणजे स्वर्गातील इंद्राची बाग, आमचं कोकण त्यापेक्षा कोठे ...

Such is Ratnagiri | अशी ही रत्नागिरी

अशी ही रत्नागिरी

Next

‘सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन’

नंदनवन म्हणजे स्वर्गातील इंद्राची बाग, आमचं कोकण त्यापेक्षा कोठे कमी आहे, कोकण म्हणजे पृथ्वीवरच नंदनवनच.

कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली सौंदर्याची उधळण, स्वच्छ, सुंदर, निर्मनुष्य सागरकिनारे… तितकीच संपन्न बंदरे, मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले किल्ले, पुरातन लेणी, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेली गावागावातील मंदिरे, तिथल्या जत्रा, उत्सव, शेकडो जाती-प्रजातींचे पशु-पक्षी, बाराही महिने आपली वेगवेगळी रूपे दाखवणारा इथला वैविधतेने नटलेला निसर्ग हे तर कोकणचं खरं वैभव. पर्यटकांना जे हवं असत ते सगळं देणारा कोकण.

पण आमच्या या श्रीमंतीची आजवर जणू आम्हालाच जाणीव नव्हती. आमच्या वैभवाची ताकद जणू आम्हालाच माहीत नव्हती. म्हणजे आमची स्थिती त्या कस्तुरी मृगासारखी होती. आपल्याजवळच्या ठेव्याचं आपण जर योग्य मार्केटिंग करण्यात यशस्वी झालो तर कोकण येणाऱ्या काळात जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख बनवेल, यात तीळमात्र शंका नाही इतकी संपन्नता.

शहरी जीवनातील घड्याळाच्या काट्यावर धावून दमलेला माणूस गेल्या काही वर्षात कोकणातील निसर्गात आवर्जून येतोय. शरिरावरचा आणि मनावरचा ताण हलका करण्यासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकाला कोकणातला शांतपणा भावतो. प्रदूषणविरहित सागरात डुंबताना तो सारी टेंशन्स विसरून जातो, झावळ्यांनी शाकारलेल्या, शेणाने सारवलेल्या कोकणी घरात राहताना तो वेगळ्या दुनियेत हरवून जातो आणि कोकणात येणारा पर्यटक खास करून येतो तो इथल्या कोकणी स्वादाच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी. मग सकाळच्या न्याहारीतील आंबोळी आणि खोबऱ्याची चटणी असो की दुपारच्या जेवणातील ताजे फडफडीत मासे. चार दिवसांच्या कोकण वास्तव्यात तो सर्वार्थाने स्वर्गसुखाची अनुभूती घेऊनच आपल्या शहरात परततो.

इथे येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना आवडतं ते कोकणचं कोकणपण. गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प इथे लादले जात आहेत आणि गेले आहेत, त्यातून पुढील काही वर्षात आपण कोकणचं हे कोकणपण तर गमवून बसणार नाही ना, अशी भीती मनात दाटून जाते. कोकणी माणसाचा विकासाला विरोध नाही पण हा विकास कोकणचं कोकणपण टिकवून असावा, इतकीच माफक अपेक्षा आहे.

गेल्या २० वर्षांत कोकणातील गावागावातील तरुण मंडळींनी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांतून अनेक गावांतून पर्यटन विकसित झालंय. अधिक व्यावसायिक पध्दतीने पर्यटकांना सुविधा आणि सेवा देत या तरुण मंडळींनी जगभरातून आलेल्या पर्यटकांची वाहवा मिळवली आहे. यामुळेच एकदा कोकणात येऊन गेलेला पर्यटक आता पुन्हा-पुन्हा कोकणात येऊ लागला आहे.

गेल्या काही काळात रत्नागिरी पर्यटनाचे नवं डेस्टिनेशन ठरत आहे. एकेकाळी गोवा पर्यटनाचे मुख्य केंद्र होते. हळूहळू पर्यटक गोव्यातील गर्दीला कंटाळून तळकोकणातील सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांना पसंती देऊ लागला. आता गेल्या काही वर्षांत हाच पर्यटक रत्नागिरीकडे वळतोय. रत्नागिरी ही पर्यटकांना जे हवंय ते देण्यासाठी सज्ज झालेय. रत्नागिरीत येणारा पर्यटक जसा इथल्या निसर्गाने इथे ओढून आणला जातो तसा तो खास इथल्या खाद्य संस्कृतीसाठी येतो. गावागावातील पर्यटन केंद्र या पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवत आहेतच. मालवणी फिश करी तर जगभर प्रसिद्ध झाली आहे.

पण गेल्या दीड वर्षाच्या कोरोनाच्या काळात कोकणातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या काळात बंद राहिलेल्या व्यवसायाने इथल्या पर्यटन व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. या काळानंतर इथले अनेक व्यवसाय बंद झाले तर अनेकजण पुन्हा जिद्दीने उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. येणारा वर्षभराचा कालावधी या व्यावसायिकांकरिता फार महत्त्वाचा कालावधी असणार आहे. खड्ड्यांनी भरलेले शहर आणि इथे पोहोचण्याच्या मुंबई - गोवा महामार्गाची अवस्था याची सोशल मीडियातून महाराष्ट्राभर झालेली प्रसिद्धी पर्यटन व्यवसायाकरिता नकारात्मक आहे. राजकीय मंडळींनी आता थोडी राजकीय इच्छाशक्ती दाखवत ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शहरात प्रवेश केल्यानंतर एका टुरिस्ट स्पॉटला पोहोचलो आहोत, याचा फिल पर्यटकांना येईल इतपत शहर सुशोभित करणं आणि पर्यटन स्थळांच्या इथे पर्यटकांना गरजेच्या असलेल्या प्राथमिक (बेसिक) सुविधा उपलब्ध होतील, यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

आगामी काळात रत्नागिरी कोकणातील पर्यटनाच्या केंद्रस्थानी असणार आहे. स्थानिक तरुणांनी पर्यटनातून येणाऱ्या संधीत आपण कुठे असू, याचा विचार करून नियोजन केल्यास तो या विकास प्रक्रियेचा भाग बनणार आहे. प्रत्येक नजरेत निसर्गाचं एक वेगळं रूप दाखवणारी ही ‘देवभूमी’ येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

- सचिन देसाई, रत्नागिरी

Web Title: Such is Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.