राजापुरातील जैतापूर खाडीत अचानक वाळूचा उंचवटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:55 AM2019-06-01T11:55:59+5:302019-06-01T11:56:50+5:30
राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन व मिठगवाणे हद्दीत सुमारे ४ फुट उंच व ५०० मीटर लांबीचा वाळूचा सॅण्डबार (उंचवटा) नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. या उंचवट्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची झोप उडाली आहे. उंचवट्यामुळे भरतीचे पाणी खाडीत येणे बंद झाले असून, त्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणीही तळाला गेले आहे.
राजापूर : तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन व मिठगवाणे हद्दीत सुमारे ४ फुट उंच व ५०० मीटर लांबीचा वाळूचा सॅण्डबार (उंचवटा) नैसर्गिकरित्या तयार झाला आहे. या उंचवट्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची झोप उडाली आहे. उंचवट्यामुळे भरतीचे पाणी खाडीत येणे बंद झाले असून, त्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणीही तळाला गेले आहे.
जैतापूर खाडीच्या मुखापासून काही अंतरावर माडबन व मिठगवाणेच्या हद्दीत सुमारे चार फुट उंच व पाचशे मीटर लांब वाळूचा उंचवटा तयार झाला आहे. हा उंचवटा नैसर्गिकरित्या तयार झाल्याचे जैतापूरचे बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी हा उंचवटा तयार झाला असावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अचानक वाळूचा उंचवटा तयार झाल्यामुळे खाडीपट्ट्यातील जनतेसाठी समस्या निर्माण झाल्या आहेत. यापूर्वी भरतीच्यावेळी खाडीचे पाणी माडबन व मिठगवाणे गावात भरायचे. मात्र, वाळूचा ढिगारा तयार झाल्याने आता या गावात भरतीचे भरणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे या गावातील विहिरींची पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. काही विहिरींनी तर तळ गाठला आहे. विहिरींतील पाणी पुन्हा खाडीवाटे समुद्रात जाण्यासाठी मार्ग नसल्याने आजुबाजूच्या घरांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी सायंकाळी माडबन, मिठगवाणे येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी बंदर विभागाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. खाडीच्या मुखावर तयार झालेला वाळूचा उंचवटा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करु, असे आमदार साळवी यांनी या भेटीत ग्रामस्थांना सांगितले.