उतारावर ट्रकवरील नियंत्रण सुटले, महामार्गावर साखरेचा ट्रक उलटून चालक ठार; रत्नागिरीतील हातखंबा येथील दुर्घटना
By अरुण आडिवरेकर | Published: January 30, 2023 05:34 PM2023-01-30T17:34:31+5:302023-01-30T17:46:52+5:30
ट्रकच्या धडकेने एक बैल जागीच ठार
रत्नागिरी : साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील उतारावर नियंत्रण सुटल्याने ताे बाजूच्या माेकळ्या जागेत उलटून चालक ठार झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे दर्ग्याजवळील उतारावर साेमवारी (३० जानेवारी) सकाळी पावणेआठच्या दरम्यान झाला. या अपघातात ट्रकचालक फारुख इसाक जमादार (३८, रा. बागलकाेट, कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.
फारूख जमादार कर्नाटकातून ट्रक (केए २३, ए ६६९४) घेऊन जयगड बंदराकडे साखरेची पाेती घेऊन चालला होता. महामार्गावरील हातखंबा येथील उतारावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो बाजूच्या मोकळ्या जागेत उलटला. त्यामध्ये फारुख जमादार याचा मृत्यू झाला तर क्लीनर कमरान कलादगी (२४, रा. बागलकाेट, कर्नाटक) जखमी झाला आहे. या अपघातावेळी त्याठिकाणी दोन बैल चरत होते. या ट्रकच्या धडकेने त्यातील एक बैल जागीच ठार झाला.
जखमीला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेने तात्काळ रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक अमर पाटील व डी. डी. घोसाळे, हेडकाॅन्स्टेबल सचिन सावंत, चेतन उतेकर, बाजीराव निरटे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी वाहतूक पूर्ववत केली.