सुहास वासावे यांना उत्कृष्ट विस्तार शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:33 AM2021-08-27T04:33:50+5:302021-08-27T04:33:50+5:30
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्यमहाविद्यालय शिरगावचे प्राध्यापक डॉ. सुहास वासावे यांना सन २०२१ सालचा ...
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्यमहाविद्यालय शिरगावचे प्राध्यापक डॉ. सुहास वासावे यांना सन २०२१ सालचा उत्कृष्ट विस्तार शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर झाला आहे.
कर्नाटकातील सोसायटी ऑफ फिशरीज व लाइफ सायन्स संस्था दरवर्षी मत्स्यशास्र विषयात विशेष योगदान दिलेल्या देशातील निवडक शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित करते.
डॉ. सुहास वासावे मत्स्यमहाविद्यालयात मत्स्य संपत्ती अर्थ, सांख्यिकी व विस्तार शिक्षण विभागात सहयोगी प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय-राज्यस्तरीय परिसंवाद, कार्यशाळा, प्रशिक्षणे, मेळावे, जनजागृती कार्यक्रम आदी विस्तार शिक्षण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनात डॉ. वासावे यांचे विशेष योगदान आहे. तसेच पदवी-पदव्युत्तर-आचार्य विषयातील शिक्षण, विविध संशोधन प्रकल्प व शोधनिबंध, राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून राबविलेले विविधांगी सामाजिक उपक्रम, विद्यार्थीभिमुख कला-क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग राहिला आहे. निवड समितीचे अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. निनावे यांनी काम पाहिले. डॉ. वासावे यांनी पुरस्काराबाबत आनंद व्यक्त करीत मिळालेल्या यशात कुटुंबीय, महाविद्यालयातील सहकारी, विभागप्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, विद्यापीठाचे संचालक व कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचे योगदान असल्याचे सांगितले.