रत्नागिरीत खुनी पतीची कोठडीत आत्महत्या

By admin | Published: August 31, 2014 12:32 AM2014-08-31T00:32:45+5:302014-08-31T00:34:02+5:30

चादरीने घेतला गळफास : मिरज येथे इन कॅमेरा होणार शवविच्छेदन, दारूच्या नशेत पत्नीचा केला खून

Suicide in murder of murderer husband in Ratnagiri | रत्नागिरीत खुनी पतीची कोठडीत आत्महत्या

रत्नागिरीत खुनी पतीची कोठडीत आत्महत्या

Next

रत्नागिरी : दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात गाडीचा लोखंडी पाटा घालून तिला ठार मारणाऱ्या अंकुश महादेव वेलोंडे (वय ४०, मधलीवाडी-ओरी) याने शहर पोलीस स्थानकाच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. या आरोपीचा मृतदेह विच्छेदनासाठी मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला आहे.
अंकुशने दारूच्या नशेत काल, शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पत्नी अस्मिता हिच्या डोक्यात गाडीचा लोखंडी पाटा घालून ठार मारले. त्यावेळी आरोपीची तीन मुले आणि आई समोर होती. या घटनेने ओरी परिसर हादरुन गेला. पत्नीचा खून केल्यानंतर पलायन करणाऱ्या अंकुशला पोलिसांनी पकडले. त्याला शहर पोलीस स्थानकातील कोठडीत ठेवण्यात आले
होते.
आज, शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोठडीसमोर पहारा देत असलेल्या पोलिसांना तो कोठडीत दिसला नाही. त्याला हाका मारुनही आतून काहीच उत्तर येत नसल्याचे लक्षात येताच पहारेकरी पोलिसांनी इतर सहकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर कोठडीचे कुलूप उघडून पाहिले असता, अंकुश शौचालयात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.
आरोपीला झोपण्यासाठी पांघरण्यास दिलेल्या चादरीचा त्याने आत्महत्या करण्यासाठी वापर केला होता. त्याने शौचालयाच्या खिडकीच्या बीमला चादर बांधली आणि तिचा फास घेतला. पोलिसांनी त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मृत असल्याचे घोषित केले.
घटनेनंतर शहर पोलिसांनी तत्काळ आरोपीच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी मिरज (सांगली) येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला. तेथे इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यावेळी पोलिसांबरोबर दोन नातेवाईकही गेले आहेत.
(शहर वार्ताहर)
पोलिसांची चौकशी होणार..
आरोपीच्या पोलीस कोठडीतील आत्महत्येने पोलीस अडचणीत आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांची सुरुवातीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून प्राथमिक चौकशी होणार आहे. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांना सीआयडी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Suicide in murder of murderer husband in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.