12th Exam: इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, रत्नागिरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 04:25 PM2022-03-05T16:25:54+5:302022-03-05T18:02:26+5:30
वैष्णवी ही रत्नागिरीतील एक उत्कृष्ट ट्रेकर हाेती.
रत्नागिरी : बारावीचा इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आला. वैष्णवी दयाराम श्रीनाथ (२१,रा. संकल्पनगर, कारवांचीवाडी) असे गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
या घटनेची माहिती मंगेश दयाराम श्रीनाथ यांनी पाेलिसांना दिली. पेपर कठीण गेल्यानेच तिने हे पाऊल उचलल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
वैष्णवी ही बारावीत शिकत असून, ४ मार्च राेजी तिने बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर दिला. तिच्या वडिलांचा रत्नागिरी शहरात भाजीचा व्यवसाय असून, ते आपल्या मुलासाेबत सकाळी दुकानात आले हाेते. घरी ती आणि आईच हाेती. वैष्णवी सकाळी अभ्यास करण्यासाठी खाेलीत जाते सांगून गेली हाेती. बराचवेळ ती खाेलीतून बाहेर आली नसल्याने तिच्या आईने दरवाजा ठाेठावला. मात्र, तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.
आईने तत्काळ आपल्या मुलाला फाेन करुन याबाबत माहिती दिली. त्यांचा मुलगा घरी आला त्याने दरवाजा ताेडला तर समाेर सिलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. मुलीला या अवस्थेत पाहून तिच्या आईने हंबरडाच फाेडला.
याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संतोष कांबळे करीत आहेत.
उत्कृष्ट ट्रेकर
वैष्णवी ही रत्नागिरीतील एक उत्कृष्ट ट्रेकर हाेती. विविध भागात जाऊन तिने ट्रेकिंग केले हाेते. तिच्या जाण्याने रत्नागिरीतील एक चांगला ट्रेकर गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.