राजापूर उपनगराध्यक्षपदी सुलतान ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 03:31 PM2021-01-06T15:31:39+5:302021-01-06T15:35:19+5:30
Rajapur Nagar Parishad Ratnagiri-राजापूर येथील नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नगरसेवक सुलतान ठाकूर यांची निवड झाली आहे. सुलतान ठाकूर यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्रतीक्षा खडपे यांचा सात विरुद्ध नऊ मतांनी पराभव करत उपनगराध्यक्षपद पटकावले आहे. सुलतान ठाकूर यांना दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आहे.
राजापूर : येथील नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नगरसेवक सुलतान ठाकूर यांची निवड झाली आहे. सुलतान ठाकूर यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्रतीक्षा खडपे यांचा सात विरुद्ध नऊ मतांनी पराभव करत उपनगराध्यक्षपद पटकावले आहे. सुलतान ठाकूर यांना दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आहे.
काँग्रेसचे सात, राष्ट्रवादीचे एक व भाजपच्या एकमेव नगरसेवक असलेल्या गोविंद चव्हाण यांनी शिवसेनेविरोधात काँग्रेसला मतदान करत ठाकूर यांच्या पारड्यात आपले मत टाकले. राजापूर नगरपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असून, आघाडीत ठरलेल्या धोरणांप्रमाणे आपली उपनगराध्यक्षपदाची एक वर्षाची मुदत संपल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात ही निवडणूक पार पडली.
काँग्रेस आघाडीकडून सुलतान ठाकूर यांनी तर शिवसेनेकडून प्रतीक्षा खडपे यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते. यासाठी झालेल्या मतदानात ठाकूर यांना नऊ तर खडपे यांना सात मते पडली. ठाकूर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, शिवसेना गटनेते विनय गुरव यांच्यासह माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे व सर्व नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.
ठाकूर हे राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. गेली दहा वर्षे ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपनगराध्यक्षपदासह बांधकाम समिती सभापती म्हणून काम केलेले आहे. आता त्यांची दुसऱ्यांदा उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सूत्र राजापुरात अजून अस्तित्त्वात आलेली नाही.