कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नसल्याचा अभिमान : सुमित्रा महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 04:35 PM2019-01-22T16:35:03+5:302019-01-22T16:44:47+5:30
कोकणातील माणस ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असतील मात्र कोकणातील शेतकरी मात्र कधी आत्महत्या करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसामध्ये आहे. म्हणून देशाच्या संसदेत काम करताना एक माहेरवाशीण म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार गुहागरमध्ये श्री व्याडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या देशाच्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले.
गुहागर : कोकणातील माणस ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असतील मात्र कोकणातील शेतकरी मात्र कधी आत्महत्या करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसामध्ये आहे. म्हणून देशाच्या संसदेत काम करताना एक माहेरवाशीण म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार गुहागरमध्ये श्री व्याडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या देशाच्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले.
त्या पुढे म्हणाल्या की, कोकणातील तरुणांनी आता पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. कोकणचा विकास करायचा असेल तर सर्व पक्ष जात भेद बाजूला ठेवून तुम्ही एकत्र या. त्यासाठी देशाच्या पातळीवर जे सहकार्य माझ्या कोकणासाठी लागेल ते मी देण्यास तयार आहे, असे अभिवचन देतानाच त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, असे सांगितले. निवडणुका जवळ आल्या असल्या तरी सुध्दा मी येणाऱ्या सरकारच्या काळात सुध्दा कोकणासाठी प्रयन्न निश्चितच करेन, असे सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, कोकणच्या विकासासाठी संघटित व्हा, इंदोरमध्ये मी काम करण्यास सुरूवात केली. तेव्हा दळणवळण फार कमी होते. आपल्या राज्याला, जिल्ह्याला, तालुक्याला देशाला जोडायचे असेल तर वाहतुक व्यवस्था होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. आज इंदोरमध्ये रेल्वे, हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वात महत्वाचे निर्णय मी दळणवळणाच्या बाबतीत घेतले आणि म्हणूनच आज इंदोर प्रगतीच्या वाटेवर आहे, असे त्यांनी सांगितले.
कोकणात फळप्रक्रिया प्रकल्प उभारा
कोकणच्या शेतकऱ्यांनी सुध्दा एकत्र येऊन फळप्रक्रिया प्रकल्प उभे केले पाहिजेत. आज कोकणचा आंबा हा देशात जातो. फणस, काजू यांसारख्या फळांवर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्यास मी तयार आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी प्रयन्न केले पाहिजेत. एक माहेरवाशीण म्हणून मी नेहमीच तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.