उन्हाच्या झळा पर्यटनाला--

By admin | Published: May 27, 2016 10:50 PM2016-05-27T22:50:56+5:302016-05-27T22:51:34+5:30

कोकण किनारा

Sunlight tourism - | उन्हाच्या झळा पर्यटनाला--

उन्हाच्या झळा पर्यटनाला--

Next

गेल्या काही वर्षांपासून कोकणातील पर्यटनाला थोडे बरे दिवस येऊ लागले आहेत. पण, बदलत्या हवामानाचा जो त्रास आंबा आणि मासळीला होत आहे, तसाच त्रास आता पर्यटन क्षेत्रालाही होऊ लागला आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढल्याने पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मुलांच्या सुट्यांचा हंगाम असल्याने मे महिन्यातच फिरण्यासाठी म्हणून असंख्य लोक बाहेर पडतात. पण, यंदा उष्मा वाढला असल्याने गणपतीपुळे, गुहागर, दापोली यांसारख्या प्रमुख ठिकाणीही फार गर्दी झाली नाही आणि व्यावसायिकांवर कपाळाला हात लावण्याची वेळ आली.

सात - आठ वर्षांपूर्वी नाताळला जोडून चार - पाच सुट्ट्या आल्या होत्या. साहजिकच गोव्यात प्रचंड गर्दी झाली. राहण्यासाठी छोटीशीही जागा मिळत नव्हती म्हणून असंख्य पावले कोकणाकडे वळली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील भागातील हॉटेल्सना जोरदार प्रतिसाद मिळाला. त्या वर्षीपासून कोकणातील गर्दी वाढू लागली आहे, ती सातत्याने सुरूच आहे. इंटरनेटचा प्रभाव वाढू लागल्याचाही फायदा या पर्यटनस्थळांना होत आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सर्वाधिक प्रतिसाद मिळणारी पर्यटनस्थळे म्हणजे समुद्रकिनारी असलेली गावे. त्यातही सिंधुदुर्गातील तारकर्ली (मालवण), वेंगुर्ला, रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर आणि दापोली या ठिकाणी गर्दीचे प्रमाण अधिक असते. १५ एप्रिलनंतर अगदी १0 जूनपर्यंत या सर्व ठिकाणी पर्यटकांची जा-ये सुरू असते. दळणवळणाच्या वाढत्या सुविधा, खासगी वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता यंदाही चांगली गर्दी त्या - त्या ठिकाणच्या व्यावसायिकांना होती. मात्र, त्या साऱ्यांचीच निराशा झाली आहे. यंदा पर्यटकांचा प्रतिसाद अपेक्षेच्या १0 ते २0 टक्के इतकाच आहे. गर्दी होण्याच्या अपेक्षेने व्यावसायिकांनी अनेक गोष्टींची आगाऊ तयारी केली होती. मात्र, या साऱ्यावर उष्म्याचा वरवंटा फिरला आहे. अपेक्षित गर्दीच्या १0 ते २0 टक्के इतकाच प्रतिसाद मिळाल्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
उष्म्याचे वाढते प्रमाण हा जागतिक समस्येचाच विषय आहे. पण कोकण आजवर त्याला काही प्रमाणात तरी अपवाद होता. मोठमोठाल्या डोंगरांवरील झाडीमुळे कोकणात या दिवसात अगदी थंडावा नसला तरी असह्य होणारा उकाडाही जाणवत नव्हता. पण, आता परिस्थिती बदलली आहे. कधी वस्ती वाढत गेल्याने तर कधी सरपण, फर्निचरची गरज म्हणून आपण बेसुमार वृक्षतोड केली आहे. डोंगर उघडेबोडके पडू लागले आहेत. या साऱ्याचा परिणाम हवामानावर झाला आहे. जिकडे पाहावं तिकडे सिमेंटची जंगले उभी राहात आहेत. शहरी भागात तर इमारतींसाठीही जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत, अशी स्थिती आहे. झाडंच नसतील, तर पर्यावरण तरी संतुलीत राहणार कसे?
वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन ही आता केवळ सरकारी मोहीम न राहता लोकचळवळ होण्याची गरज आहे. वृक्ष लागवडीअभावी बसणाऱ्या झळा आता आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता तरी त्यावर गांभीर्याने काम होणे अपेक्षित आहे.
पर्यटनस्थळांच्या समस्यांचा विचार करता वीजपुरवठा हाही एक महत्त्वाचा भाग आहे. अलिकडच्या काळात भारनियमन हा शब्द आपण विसरून गेलो आहोत. महानिर्मितीचे वीजनिर्मिती प्रकल्प नेटकेपणाने सुरू आहेत, त्याचे वितरण सुयोग्य पद्धतीने होत आहे. त्यामुळे मागणी वाढूनही भारनियमनाची वेळ आपल्यावर आलेली नाही. पण, पर्यटनस्थळांना विनाखंड वीज उपलब्ध होणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळेमध्ये रात्री खंडित झालेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळी सुरळीत झाला. जवळजवळ सर्वच पर्यटकांनी हॉटेल मालकांशी वाद घातला. काही पर्यटकांनी हॉटेल मालकांकडून पैसे परत घेतले. मनस्ताप आणि थेट आर्थिक नुकसान असा दोन्ही बाजूंचा त्रास व्यावसायिकांना झाला. ज्यावर खूप मोठी आर्थिक गणिते अवलंबून आहेत, अशा पर्यटनस्थळांना विनाखंड वीजपुरवठा आणि पाणी पुरवठा करण्यावर खरंतर भर असायला हवा. जिल्हा नियोजन समितीपुढे तसा प्रस्ताव जायला हवा. पण रत्नागिरीचे राजकारणी अशाबाबत खूप उदासीन आहेत. या राजकीय उदासीनतेचाच फटका सर्वसामान्यांना वारंवार सहन करावा लागत आहे.

Web Title: Sunlight tourism -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.