लाेटेतील दुर्घटनेची पाेलीस अधीक्षकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:39 AM2021-04-30T04:39:33+5:302021-04-30T04:39:33+5:30
रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे येथील औद्योगिक वसाहतीतील एम.आर. फार्मा कंपनीत २८ एप्रिल रोजी सकाळी ११.१५ वाजण्याचा सुमारास भीषण ...
रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे येथील औद्योगिक वसाहतीतील एम.आर. फार्मा कंपनीत २८ एप्रिल रोजी सकाळी ११.१५ वाजण्याचा सुमारास भीषण आग लागली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाकडून ही आग विझवण्यात आलेली आहे.
काही दिवसांपूर्वीच लोटे औद्याेगिकमधील घरडा केमिकल्स व त्यानंतर समर्थ केमिकल्स या कंपन्यांमध्ये लागलेल्या आगीमध्ये एकूण ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर काही कामगार जखमी झाले होते. बुधवारी पुन्हा एमआर फार्मा या कंपनीत आगीची दुर्घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी या घटनेची माहिती मिळताच तत्काळ लोटे येथील या घटनास्थळी भेट दिली.
पोलीस अधीक्षक यांनी कंपनी व्यवस्थापनाकडून घटनेबाबत माहिती घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच या घटनेच्या अनुषंगाने तपासाच्या दृष्टीने यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, पोलीस निरीक्षक नीशा जाधव यांना योग्य त्या सूचना दिल्या. या घटनेचा तपास खेड पोलीस करत आहेत.