अंगणवाड्यांचा रॉकेल पुरवठा थांबणार, पुरवठा विभागाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 03:50 PM2019-01-29T15:50:57+5:302019-01-29T15:52:34+5:30
राजापूर तालुक्यातील अंगणवाड्यांनी गॅस सिलेंडर्सचा वापर करावा यासाठी यापुढे त्यांना रॉकेलचा पुरवठा केला जावू नये, अशा तोंडी सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून येथील पुरवठा शाखेला दिल्यामुळे बहुतांशी अंगणवाड्यातील पोषण आहार कसा शिजवायचा असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे .
राजापूर : तालुक्यातील अंगणवाड्यांनी गॅस सिलेंडर्सचा वापर करावा यासाठी यापुढे त्यांना रॉकेलचा पुरवठा केला जावू नये, अशा तोंडी सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून येथील पुरवठा शाखेला दिल्यामुळे बहुतांशी अंगणवाड्यातील पोषण आहार कसा शिजवायचा असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे .
राजापूर तालुक्यात ४०३ अंगणवाड्या असून त्यांना दिलेला पोषण आहार शिजविण्यासाठी पुरवठा विभागाकडून महिन्याला पाच लिटर रॉकेल पुरवले जात होते. यामध्ये दहा ते पंधरा अंगणवाड्यांकडे सिलेंडर्स आहेत. सिलेंडर्सचा वापर अधिक वाढावा यासाठी अंगणवाड्यांना यापुढे रॉकेलचा पुरवठा केला जावू नये, अशा तोंडी सुचना येथील पुरवठा विभागाला आल्याचे सांगण्यात आले.
जर अंगणवाड्यांना होणारा रॉकेलचा पुरवठा बंद करण्यात आला तर त्या अंगणवाड्यांनी पोषण आहार कसा शिजवायचा? असा प्रश्न बहुतांशी अंगणवाड्यांपुढे उभा रहाणार आहे. कारण किरकोळ अंगणवाड्या वगळता तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांकडे गॅस सिलेंडर्सची सुविधा नाही व दुसरीकडे पुरवठा विभागाकडून रॉकेल पुरवठा बंद करण्याच्या आलेल्या सूचना त्यामुळे मुलांना पोषण आहार कसा शिजवून द्यायचा, अशी डोकेदुखी अंगणवाड्यांची वाढली आहे.
शासनाने अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांचे कुपोषण होवू नये म्हणून पोषण आहार सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व अंगणवाड्यातून पोषण आहार चांगल्या प्रकारे शिजवून दिला जात होता. मात्र जिल्हा पुरवठा विभागाच्या तोंडी सुचनांमुळे अनेक अंगणवाड्यातील पोषण आहार बंद पडण्याजोगी स्थिती निर्माण झाल्याने शासनाच्या मुळ धोरणालाच तडा गेला आहे, अशी टिका आता होवू लागली आहे.
अनेक अंगणवाड्या या डोंगराळ परिसरात असल्याने सिंलेंडर्स कसे घेवून जायचे? अशाही समस्या अंगणवाडी सेविकांसह त्यांच्या सहाय्यकांपुढे निर्माण झाल्या आहेत. पाच लिटरचा रॉकेलचा कॅन कसातरी हातातून नेता येतो. पण अंगणवाडी सेविका सिलेंडर्स कसा घेवुन जाणार? त्यामुळे कदाचित यापुढे अनेक अंगणवाड्यांमधील पोषण आहार बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.