प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागणीनुसार औषध पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:50+5:302021-05-01T04:29:50+5:30
चिपळूण : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. काळाची गरज ओळखून वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत खासगी कोविड सेंटरही वाढत आहेत. ...
चिपळूण : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. काळाची गरज ओळखून वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत खासगी कोविड सेंटरही वाढत आहेत. कोरोनाचा उद्रेक वाढला तरी आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागणीनुसार औषध पुरवठा करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्या पूजा निकम यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
कोविड लसीकरणावरून संपूर्ण तालुक्यात गोंधळाची परिस्थिती आहे. अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्रावर नेहमी वादा-वादीचे प्रकार घडत आहेत. सावर्डे गणात योग्यरीत्या लसीकरण व्हावे. यासाठी पंचायत समिती सदस्य पूजा निकम यांनी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत लसीकरणाची माहिती घेतली. ज्या गावात आरोग्य विभागाचे उपकेंद्र आहे. तिथे लस पुरवठा करण्यात यावा. उपकेंद्राला लस मिळाल्यास तिथेच लसीकरण केंद्र सुरू करता येईल, अशी सूचना निकम यांनी केली. कोरोना आजारा व्यतिरिक्त रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. अनेकदा त्यांना किरकोळ औषधेही मिळत नाहीत. व्हिटॅमिन सी, कफ सिरप यासारख्या औषधांचा मुलबक प्रमाणात पुरवठा व्हायला हवा. किमान प्राथमिक आरोग्य केंद्रात जेवढी औषधे आवश्यक आहेत, तितका तरी पुरवठा व्हायला हवा. पण तसा होत नसल्याने निकम यांनी थेट जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
कोरोना कालावधी किमान रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेला औषधसाठा पुरेसा असणे गरजेचे आहे. केंद्रात औषधेच नसतील तर काय उपचार करणार. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाकडून खासगी डॉक्टरांची बैठक विविध ठिकाणी घेण्यात आली होती. यामध्ये आरोग्य विभागाकडील प्राथमिक उपचाराच्या मर्यादा स्पष्टपणे मांडण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रास पुरेसा औषध पुरवठा करावा, अशी मागणी निकम यांनी केली आहे. निकम लसीकरण केंद्रासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्या आहेत. लवकरच उपकेंद्रात लसीकरणास सुरुवात करण्याची ग्वाही आरोग्य विभागाकडून देण्यात आली.