आराेग्य पथकाला सहकार्य करा : प्रतिभा वराळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:01+5:302021-05-09T04:33:01+5:30
राजापूर : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत राजापुरात आरोग्य सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी ...
राजापूर : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत राजापुरात आरोग्य सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी हे काम करणाऱ्या आरोग्य पथकांसह ग्राम कृती दलांना जनतेकडून सहकार्य केले जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या आरोग्य पथके व ग्राम कृती दलांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे.
मात्र जर का अशा प्रकारे कुणी असहकार्य करत या आरोग्य पथके व ग्राम कृती दलाच्या सदस्यांशी गैरवर्तन केले तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही वराळे यांनी दिला आहे.
अभियानांतर्गत राजापूर शहराबरोबरच तालुक्यातील १०१ ग्रामपंचयतींमध्ये आरोग्य विभाग व ग्राम कृती दलाच्या माध्यमातून ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवून हे अभियान राबविले जात आहे.
मात्र, काही ठिकाणी ग्रामस्थांकडून आरोग्य पथकांना सहकार्य केले जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. योग्य प्रकारे माहिती न देणे, आजारी व्यक्तीबाबत माहिती न सांगणे असे प्रकारे घडत आहेत. पेंडखळे चिपटेवाडी येथे अशाच प्रकारे आरोग्य पथकाशी असहकार्य करत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचे वराळे यांनी सांगितले. त्यामुळे असे प्रकारे यापुढे तालुक्यात घडता कामा नयेत, कारण ही मंडळी आपल्या सुरक्षिततेसाठी काम करत असून, त्यांना सहकार्य करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे वराळे यांनी सांगितले.