अपंग व्यक्तींच्या विवाहास सहाय्य
By admin | Published: July 17, 2014 11:45 PM2014-07-17T23:45:36+5:302014-07-17T23:53:29+5:30
जिल्हा परिषद : आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर निर्णय
रत्नागिरी : सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अपंग व्यक्तींना आपले कौटुंबीक जीवन व्यतित करता यावे, यासाठी आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग - अव्यंग असलेल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून ५० हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. अपंग - अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली असून, त्याप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे.
अपंग व अव्यंग विवाहितांना प्रोत्साहन देण्याची ही योजना किमान आहे. त्यासाठी ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्या सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास ही योजना लागू करण्यात आली आहे. अशा जोडप्यास २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रुपये रोख स्वरुपात, ४५०० रुपये संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. ५०० रुपये स्वागत समारंभाच्या कार्यक्रमावर खर्च. असे एकूण ५० हजार रुपये या जोडप्यास शासनाकडून देण्यात येणार आहेत. ही योजना १ एप्रिल या आर्थिक वर्षापासून नव्याने विवाहीत होणाऱ्या जोडप्यांना लागू करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्त्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. (शहर वार्ताहर)