राजकीय समर्थनांमुळे प्रकल्प समर्थकांना पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:42 PM2021-03-13T17:42:15+5:302021-03-13T17:44:10+5:30
nanar refinery project Ratnagiri- विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत रिफायनरी समर्थकांनी प्रकल्पाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोर लावला आहे. आजवर केवळ विरोधच होणाऱ्या कोकणात प्रकल्प होण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, हे चित्र प्रथमच दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक पातळीवर प्रकल्पाचे समर्थक वाढत असताना, आता राजकीय पातळीवरूनही समर्थन वाढू लागल्याने, प्रकल्पाबाबतचे सकारात्मक वातावरण वाढू लागले आहे.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत रिफायनरी समर्थकांनी प्रकल्पाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोर लावला आहे. आजवर केवळ विरोधच होणाऱ्या कोकणात प्रकल्प होण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, हे चित्र प्रथमच दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक पातळीवर प्रकल्पाचे समर्थक वाढत असताना, आता राजकीय पातळीवरूनही समर्थन वाढू लागल्याने, प्रकल्पाबाबतचे सकारात्मक वातावरण वाढू लागले आहे.
रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षांत सातत्याने केली जात आहे. ज्या गावांना प्रकल्प नको आहे, ती गावे वगळून उर्वरित गावांचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात समाविष्ट गावांमधील ८० टक्के लोकांची संमतीपत्रे तयार आहेत. त्या लोकांची प्रकल्पासाठी जागा देण्याची तयारी आहे.
स्थानिकांची मागणी हवी, हा मुद्दा मांडतानाच जिल्ह्यातील लोकांचा प्रकल्पाला पाठिंबा हवा, असा मुद्दाही शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. त्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशा घोषणा देत रत्नागिरीत मोर्चाही काढला. मात्र, तरीही प्रकल्पाबाबत कोणतीच प्रगती झाली नाही.
लोकांना हवा आहे, एवढ्या एका कारणासाठी प्रकल्प होणार नाही. त्यासाठी ते राजकीय लोकांच्या मनात यायला हवे, राजकीय इच्छाशक्ती दांडगी असायला हवी, हे लक्षात घेऊन गेल्या वर्षापासून रिफायनरी समर्थकांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. जोवर राजाश्रय नाही, तोपर्यंत प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची पावले पडणार नाहीत.
ही बाब लक्षात घेऊन राजकीय गाठीभेटी वाढल्या आहेत. या सर्व भेटींमध्ये राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत प्रकल्पाबाबत समर्थनाची भूमिका मांडली आहे. बाकी नेत्यांनी आपली भूमिका गोल गोल शब्दात मांडली असली, तरी त्यांनी सकारात्मकता ठेवली आहे. त्यांनी याबाबत पुढील गरजेच्या गोष्टी सुरू केल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीतूनही खूप काही साध्य होत आहे, ही बाब प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे प्रकल्प समर्थकांना पाठबळ मिळाले आहे.
गतवर्षापासून झालेल्या राजकीय नेत्यांच्या भेटी
गतवर्षी जुलै महिन्यात आमदार राजन साळवी, हुस्नबानू खलिफे, ऑगस्ट महिन्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सप्टेंबर महिन्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नोव्हेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, जानेवारीमध्ये खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, फेब्रुवारी महिन्यात खासदार सुप्रिया सुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, माजी खासदार हुसेन दलवाई आणि मार्च महिन्यात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.