परितोषची आलिशान बीएमडब्ल्यू जप्त
By admin | Published: September 6, 2016 11:31 PM2016-09-06T23:31:56+5:302016-09-06T23:42:25+5:30
४० लाखांची फसवणूक : मर्सिडीजचा शोध सुरू
रत्नागिरी : नोकरीचे आमिष दाखवून ४० लाखांचा गंडा घालणाऱ्या परितोष मधुकर बिर्ला (माळ नाका, रत्नागिरी) याने सगळा पैसा आलिशान कार व चैनीच्या वस्तू घेण्यासाठी खर्च केला असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याची बीएमडब्ल्यू ही आलिशान कार पोलिसांनी जप्त केली असून त्याच्या मर्सिडीज बेंज कारचा शोध पोलीस घेत आहेत. १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल व अन्य वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. परितोष बिर्ला हा मूळचा राजस्थान येथील आहे. सन २०१२ मध्ये तो कामानिमित्त रत्नागिरीत आला. त्यानंतर त्याने रत्नागिरीतील कुवारबाव परिसरात एक रॅम्प चालविण्यासाठी घेतला. हायफाय राहण्याची सवय लागलेल्या परितोषला पैशाची हाव होती. काही नागरिकांशी जवळीक साधून त्याने मित्रवर्ग मोठ्या प्रमाणात बनविला. त्यावेळी त्याची ओळख मलकापूर (जि. कोल्हापूर) येथील अभिषेक खरात याच्या सोबत झाली. त्या ओळखीचा फायदा घेत त्याने बाराजणांना ४० लाख ४० हजाराला गंडा घातला. त्यामध्ये अभिषेक खरात यालाच सर्वाधिक सहा लाखाला गंडा त्याने घातला आहे. जिल्हा परिषदेला चांगली ओळख असून तुमच्या मुलांना नोकरीला लावतो असे सांगून तब्बल बाराजणांना त्याने ४० लाख ४० हजार रुपयांना गंडा घातला. त्याने जिल्हा परिषदेचे खोटे शिक्केही तयार केले व अनेकांना नियुक्ती पत्रेही दिली; परंतु ही पत्रे बनावट होती. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याबाबत बेबीताई गोपणे (मलकापूर, कोल्हापूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यामुळे शहर पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याने या पैशातून मर्सिडीज बेंज व बीएमडब्ल्यू अलिशान कार व चैनीच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. या फसवणुकीला बळी पडलेल्या सर्वांना पोलिसांनी बोलावून घेतले असून त्यांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मागदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर) आकडा वाढणार? या प्रकरणात अजून एका व्यक्तीची ३ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे पुढे येत आहे. त्याचा शोध पोलिस घेत असून त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.