दूषित पाण्याची यंत्रणेकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2016 10:22 PM2016-05-30T22:22:48+5:302016-05-31T00:34:33+5:30
सोनपात्रा नदी : ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याची कबुली--लोकमतचा प्रभाव
आवाशी : कोतवली येथील सोनपात्रा नदीत सोडलेल्या दूषित पाणी प्रकरणाकडे शासकीय यंत्रणेने केलेल्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगितले. मात्र, याबाबत कोतवली ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याची कबुलीदेखील ‘त्या’ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमधून दि. २४ मे रोजी रात्री कोतवली येथील सोनपात्रा नदीत दूषित सांडपाणी सोडले गेले. ही बाब दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आली. गावातील काही जनावरे हे दूषित पाणी प्यायली तसेच गावातील पाणवठेही यामुळे दूषित झाल्याचे पहावयास मिळाले. ग्रामपंचायतीने एम.पी.सी.बी., एम.आय.डी.सी., सी.ई.टी.पी.ला याची माहिती दिली. मात्र, या घटनेची दखल वरीलपैकी कोणीही घेतली नाही. अखेर ग्रामपंचायतीने खेड तहसीलदारांकडे संपर्क साधून या घटनेचा पंचनामा केला. याबाबत लेखी तक्रार ग्रामपंचायतीने खेड तहसीलदार यांचेकडे केली आहे.
असे प्रकार वारंवार होत असताना वरील यंत्रणेला कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. त्याचबरोबर अनेकदा पंचनामे करूनही त्याचा अहवाल आजपर्यंत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आता तयार करण्यात आलेला अहवाल हा लेखी स्वरुपात मिळण्याची मागणीही केली आहे.
‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. आम्ही लगेचच घटनास्थळावर जाऊन आलो होतो. तसेच गेले तीन दिवस आम्ही त्या ठिकाणी पाहणी केल्याचे, सी.ई.टी.पी.च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, याबाबत तेथील ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. पाहणी करून आपण अहवाल तयार केल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत एम.आय.डी.सी. व एम.पी.सी.बी. यांचेकडे संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)
पुन्हा तसाच प्रकार : चेंबर ओव्हरफ्लो
चार दिवसांपूर्वी सोनपात्रा नदी दूषित झाली असतानाच तसाच प्रकार पुन्हा घडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. लोटे गावची स्मशानभूमी व जुनी बंद असणारी काणेकर इंडस्ट्रीज यालगत असणारे सी.ई.टी.पी.मध्ये सांडपाणी वाहून नेणारे एम.आय.डी.सी.चे चेंबर ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याचे प्रवीण कदम व जितेंद्र आंब्रे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही बाब सी.ई.टी.पी.ला कळविल्याचे सांगितले.