पूरग्रस्त गावांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:28 AM2021-08-01T04:28:39+5:302021-08-01T04:28:39+5:30

रस्त्यांचे बांधकाम प्रलंबित रत्नागिरी : शहरातील परटवणे पुलाच्या जोड रस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित आहे. ते बांधकाम होणे आवश्यक ...

Survey of flooded villages | पूरग्रस्त गावांची पाहणी

पूरग्रस्त गावांची पाहणी

Next

रस्त्यांचे बांधकाम प्रलंबित

रत्नागिरी : शहरातील परटवणे पुलाच्या जोड रस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित आहे. ते बांधकाम होणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी केली आहे. कार्यकाळ संपल्यानंतर आजपर्यंत त्या जोड रस्त्याच्या कामाकडे कोणीही लक्ष दिले नाही. तो जोड रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

कोकण रेल्वेची निवडणूक

रत्नागिरी : कोकण रेल्वेची निवडणूक दि.४ व ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीत केआरसी एम्प्लाॅईज युनियन व रेल कामगार सेनेने युती केली आहे. त्यांच्यासमोर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन रिंगणात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध युनियन सभा घेत असून कर्मचाऱ्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एस. टी. वाहतूक सुरू

रत्नागिरी : अणुस्कुरा घाटमार्गे एस. टी.ने आपली वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे कोल्हापूरला एस. टी.ने जाणे शक्य होणार आहे. रत्नागिरी व राजापूरच्या प्रवाशांसाठी दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी आगारातून सकाळी ७.३० वाजता बस सुटत असून, दुपारी १.५ वाजता पोहोचते तर कोल्हापुरातून दुपारी २ वाजता गाडी रत्नागिरीसाठी सुटत असून सायंकाळी ७.३५ वाजता रत्नागिरीत येत आहे.

कृषी विभागाचा पुढाकार

रत्नागिरी : भातपिकाचे नुकसान झाल्यानंतर विमा परताव्यासाठी ७२ तासात पूर्वसूचना मिळणे आवश्यक असते. दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क तुटलेला आहे. अशा परिस्थितीत कृषी सहायकाला प्राप्त झालेल्या पूर्वसूचना ग्राह्य धरण्यास विमा कंपनींना कृषी विभागाने करायला लावले आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या १०१ इतकी झाली आहे.

मोफत औषधोपचार

चिपळूण : ठाणे येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे आपत्ती व्यवस्थापन पथक चिपळूणात दाखल झाले आहे. या पथकातर्फे चिपळूणात मोफत औषधोपचार करण्यात आले. गांधीनगर, पेठमाप, मुरादपूर, खेर्डी, मार्कंडी भागात नागरिकांची मोफत वैद्यकीय सेवा केली. यावेळी पथकासमवेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अभय मोहिते, डाॅ. अब्बास जबले, व्यावसायिक वैभव चव्हाण उपस्थित होते.

आज उपोषण

दापोली : दापोली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विविध विकासकामांबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी दि. १ ऑगस्ट रोजी दापोली नगरपंचायतीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. शिवस्मारक कामात दिरंगाई, गणेश विसर्जन घाटाचे बांधकाम करण्यास दिरंगाई आदी विविध प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

बदली करण्याची मागणी

राजापूर : एस. टी. आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा ठपका ठेवत त्यांची राजापूरच्या बाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या सभेत सदस्यांना दिलेली उलटसुलट उत्तरे अंगलट आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रामपंचायतींना दिलासा

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या पथदीप व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांचा योग्य मेळ साधण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत महावितरण कंपनीने वीज जोडण्या खंडित करू नयेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. समितीचा अहवाल दि.१५ ऑगस्टपर्यंत शासनाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे.

खड्डे बुजविण्याची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अंतर्गत रस्ते निकृष्ट झाले असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अपघाताचा धोका वाढला असून तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Survey of flooded villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.