मंडणगडात सर्वेक्षणात आढळले १५ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:29 AM2021-05-17T04:29:41+5:302021-05-17T04:29:41+5:30
६० संशयितांची चाचणी, आरोग्याबाबत मार्गदर्शक सूचना लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत मंडणगड तालुक्यातील गावोगावी ...
६० संशयितांची चाचणी, आरोग्याबाबत मार्गदर्शक सूचना
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत मंडणगड तालुक्यातील गावोगावी ४५ हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी लक्षणे आढळलेल्या ६० व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली़. त्यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मंडणगड गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी दिली. तालुक्यातील काही गावांमध्ये गटविकास अधिकारी भिंगारदेवे यांनी सर्वेक्षण व तपासणी मोहिमेत सहभाग नोंदविला हाेता. त्यांनी प्रत्यक्ष व प्रसिध्दी पत्रकाद्वारे नागरिकांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. तसेच वेळीच चाचणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन केले.
मंडणगडमधील सर्व गावांतून ३ ते १५ मे २०२१ दरम्यान ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात आली. ग्रामसेवक, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी यामध्ये सहभाग घेतला हाेता. त्यांची ८६ पथके कार्यरत करण्यात आली होती. संपूर्ण सर्वेक्षणात सुमारे १५० संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६० व्यक्तींची चाचणी करण्यात आली. अभियानाचे नियोजन व मॉनिटरिंग गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी केले.
----------------------
गटविकास अधिकारीही उतरले सर्वेक्षणात
तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यासाठी ८६ पथके कार्यरत करण्यात आली. सर्व शासकीय कर्मचारी यासाठी मेहनत घेत होते. यादरम्यान मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे या मोहिमेचे नेतृत्व करीत होते. त्याचबरोबर त्यांनी स्वतः बाणकोट येथे जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षणात सहभाग घेतला. अनेक नागरिकांची तपासणी करून त्यांच्याशी संवाद साधला. मार्गदर्शक सूचना केल्या.
-----------------------
मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ आरोग्य सर्वेक्षणात गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी नागरिकांची तपासणी केली.