जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:19 PM2021-02-23T12:19:43+5:302021-02-23T12:20:32+5:30
wildlife RatnagiriNews- गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छिमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबियांकडून जीवदान देण्यात आले.
असगोली : गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छिमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबियांकडून जीवदान देण्यात आले.
तवसाळ आगर येथील अवधूत पाटील आणि त्यांचा पुतण्या विक्रांत पाटील हे बिगर यांत्रिकी होडीतून मासेमारीसाठी गेले होते. पाण्यात टाकलेले जाळे त्यांनी वर घेतले असता त्यात ऑलिव्ह रिडले जातीचे कासव दिसले. कासव अडकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःचे किमती जाळे कापून त्या कासवाची जाळ्यातून मुक्तता करून त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिले.
याबाबत अवधूत पाटील यांनी सांगितले की, माशांसाठी टाकलेल्या जाळ्यात कासव अडकण्याचा हा आठवडाभरातील तिसरा प्रकार आहे. कासवांसाठी सध्याचा हा हंगाम अंडी घालण्याचा असल्याने किनाऱ्याकडे येणारे मादी कासव जाळ्यात अडकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
तवसाळ समुद्रकिनारी सात ते आठ ठिकाणी कासवांची अंडी मिळाली असल्याने हेही कासव अंडी घालण्यासाठीच आसरा घेत असल्याची शक्यता असून, आम्ही किमती जाळ्यांची पर्वा न करता त्या कासवाला पाण्यातल्या पाण्यातच जाळ्यातून सोडवून पुन्हा समुद्रात सोडून दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
नुकसान भरपाईचा प्रस्ताव
दुर्मीळ माशांच्या प्रजातींचे रक्षण करताना नुकसान झाल्यास संबंधितांना त्याची नुकसान भरपाई मिळण्याची महाराष्ट्र शासन मत्स्य विभागाची योजना आहे. त्यानुसार अवधूत पाटील यांनी गुहागरचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी) यांच्याकडे संपर्क साधला. याबाबत सर्व कागदपत्रे व परिस्थितीजन्य पुराव्यांची पडताळणी करुन पाटील यांच्या नुकसान भरपाई संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याचे सांगण्यात आले आहे.