खुनाच्या आरोपातील २७ वर्षे फरार संशयित गजाआड, खेड पोलिसांनी उत्तर प्रदेशात केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 05:00 PM2023-04-22T17:00:38+5:302023-04-22T17:00:58+5:30
मयत झाल्याचे भासवून वेगळीच ओळख घेऊन राहत होता
खेड : तालुक्यातील लोटे येथे कंपनीत २७ वर्षांपूर्वी सखाराम मांजरेकर यांचा खून करून फरार झालेल्या संशयित आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. सुरेशचंद्र राम खिलवान (५०, रा. छिमी पुरीईन, ता. खागा, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिलवान आणि सखाराम मांजरेकर लोटे येथील एका कंपनीत कामाला होते. खिलवान याने रागाच्या भरात सखाराम यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याचा संशय आहे. त्यानंतर तो पळून गेला होता. २७ वर्षे त्याचा शोध लागत नव्हता.
खेड पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. त्यामध्ये खेड पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुजित सोनावणे, अजय कडू, वैभव ओहोळ, राम नागूलवर, तुषार झेंड यांनी ही मोलाची कामगिरी बजावली. सुमारे २७ वर्षांपासून फरारी असणारा संशयित आरोपी सुरेशचंद्र राम खिलवान याला ताब्यात घेण्यात या पथकाला यश आले. खिलवान याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, खेड पोलिसांचे पथक त्याला घेऊन उत्तर प्रदेश येथून खेडकडे येण्यासाठी निघाले आहे.
स्वत:च्या मृत्यूचा दाखला बनवला
गुन्हा केल्यापासून खिलवान आपली ओळख लपवून वेळोवेळी ठिकाणे बदलत होता. त्याने २००८ मध्ये स्वतःचा बनावट मृत्यू दाखला बनवून घेतला होता. आपण मयत झाल्याचे भासवून तो वेगळीच ओळख घेऊन राहत होता.