खेडमध्ये पोलिस कोठडीतील संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू, मृत बिहारमधील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:04 PM2024-01-24T13:04:07+5:302024-01-24T13:05:08+5:30
दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून महिलेला बेशुद्ध करून दागिने लुटल्याच्या प्रकरणात केली होती अटक
खेड : सोने-चांदी पॉलिश करून फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील एका संशयिताचा मंगळवारी उपचारादरम्यान कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मोहंमद सुबेर इम्रान शेख (२८, तुलसीपूर जमुनिया जि. भागलपूर, बिहार) असे या संशयिताचे नाव आहे. त्याला सतत उलट्यांचा त्रास होत असल्याने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संशयित टोळीला खेडपोलिसांनी अटक केली आहे.
दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून महिलेला बेशुद्ध करून दागिने लुटल्याचा प्रकार ८ जानेवारीला खेडमध्ये घडला होता. या घटनेत ४ लाख ८० हजार इतक्या किमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या व २ सोन्याच्या पाटल्या घेऊन आरोपी पळून गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी २१ जानेवारीला नाशिक येथून एका टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले.
यात मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८), साजिद लाडू साह (२४), मोहंमद आबिद इल्यास शेख (२९), महंमद जुबेर फती आलम शेख (३२, सर्व राहणार तुलसीपूर जमुनिया, जिल्हा भागलपूर, राज्य बिहार) तसेच नंदकुमार श्रीरंग माने (५०, रा. मनमाड शिवाजी चौक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक) यांचा समावेश आहे.
या टोळीने महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात एकूण २१ महिलांची अशाप्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, जालना व संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर हे आपल्या पथकासह या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यांच्या पथकामार्फत या गुन्ह्यामध्ये जुनी माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे नाशिकमधील मनमाड येथून या टोळीला ताब्यात घेतले. त्याच दिवशी सायंकाळी उशिरा ते खेडमध्ये आले. २२ जानेवारीला या संशयितांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
२३ जानेवारीला दुपारी या पाच संशयितांपैकी मोहंमद सुबेर इम्रान शेख याला उलट्यांचा त्रास होऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. एस. के. बळवंत यांनी प्राथमिक उपचार सुरू केले. परंतु त्यादरम्यान शेख याचा मृत्यू झाला. मोहंमद शेख याचा मृतदेह विच्छेदनासाठी कोल्हापूर येथे नेण्यात येणार असल्याचे डॉ. बळवंत यांनी सांगितले. त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे त्यानंतरच उघड होणार आहे.