दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचा संशय, एटीएसने रत्नागिरीतून एकाला घेतले ताब्यात
By अरुण आडिवरेकर | Published: July 27, 2023 05:34 PM2023-07-27T17:34:46+5:302023-07-27T17:35:51+5:30
कसून चौकशी सुरु
रत्नागिरी : दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून कोथरुड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरीतील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पुढे आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या नवी मुंबई युनिटने ही कारवाई केली आहे. त्याची कसून चौकशी सुरु असून, या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे आढळल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
पुण्यात दुचाकीचोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन संशयितांचा दहशतवादी कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यांना ५ ऑगस्टपर्यंत एटीएस काेठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला हाेता. हे दोघे १५ महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. या दाेघांची चौकशी केली असता अनेक नावे समोर आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने अलीकडेच पुण्यात अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान दोघांच्या चौकशीतून आणखी काही लोकांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर एटीएसच्या पथकाने अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर इथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) त्यांचा शोध घेत होती. एनआयएने तिसऱ्या संशयितावर पाच लाखाचे इनामही जाहीर केले आहे. दरम्यान, पुणे पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या दाेघांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी कारवाईत रत्नागिरीतील एकाचा समावेश असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. त्यानुसार पाेलिसांनी रत्नागिरीतून एकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चाैकशी सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.