सेस कराचा निर्णय स्थगित
By admin | Published: August 21, 2016 10:26 PM2016-08-21T22:26:09+5:302016-08-21T22:26:09+5:30
उदय सामंत : १५ दिवसात मच्छीमार-बाजार समितीची बैठक
रत्नागिरी : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सेस कराबाबत निर्णय अमलात आणण्याआधी येत्या १५ दिवसात मच्छीमार व कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक आयोजित करून त्यात तोडगा काढला जाईल. तोपर्यंत २२ आॅगस्टपासून अंमलबजावणी होणाऱ्या सेस कराच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत समितीचे सभापती गजानन पाटील यांच्याशी आपली चर्चा झाल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
सेस कराच्या निर्णयाविरोधात मच्छीमार नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे मच्छीमारांमध्ये प्रचंड असंतोष माजला होता. याबाबत आपण मच्छीमार नेते नुरा पटेल, सुलेमान मुल्ला, शब्बीर वस्ता, नदीम सोलकर, इसा जिवाजी आदींशी चर्चा केली. याबाबत बाजार समिती व मच्छीमारांची बैठक घेऊन चर्चेतूून निर्णय अंतिम करण्याची विनंती केली. त्यानुसार बाजार समिती व मच्छीमार यांची बैठक होईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्याचे सभापती पाटील यांनी मान्य केले आहे.
नेपाळी खलाशी व पोलीस यांचे चांगले सहकार्य आहे. मात्र, स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचे नेपाळी खलाशांबाबत काही गैरसमज आहेत. त्यामुळे ते खलाशी दिसले की, हे पोलीस चालायला लागा, असे सांगतात. याबाबत आपली जिल्हा पोलीस अधीक्षकांबरोबर चर्चा झाली असून, उद्या अधीक्षकांनी दुपारी १२ वाजता याबाबत बैठक आयोजित केली आहे.
मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला स्थगिती दिलेली नाही, काम सुरू आहे. याबाबत आपण बंदरावर जाऊन पाहणी करणार आहोत. मच्छीमारांना दुसऱ्या टप्प्यात प्रथम काय हवे, त्यानुसारच काम होणे आवश्यक आहे. प्राधान्यक्रमाची कामेच प्रथम सुरू करण्यास सांगणार असल्याचे सामंत म्हणाले. अल्ट्रा टेक कंपनीच्या वाहतुकीमुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्याची जबाबदारी त्या कंपनीची आहे. येत्या आठ दिवसात कंपनीने हे खड्डे भरावेत, अन्यथा वाहतूक करू दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)