तेजस एक्सप्रेसमधील विषबाधाप्रकरणी दोघे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:03 PM2017-10-16T16:03:27+5:302017-10-16T16:08:12+5:30
कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा प्रकरणी रेल्वे प्रशासनाने दोन जणांना निलंबित केले आहे.
चिपळूण (जि. रत्नागिरी) , दि. १६ : कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा प्रकरणी रेल्वे प्रशासनाने दोन जणांना निलंबित केले आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशनने (आयआरसीटीसी)च्या कॅटरिंगचे व्यवस्थापक आणि एका कर्मचाऱ्याला कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत रेल्वे प्रशासनाने सोमवारी निलंबित केले आहे.
चिपळुणातील खासगी रुग्णालयात या सर्व रुग्णाना दाखल केले होते. यातील चौघांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. तीन महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या खानपान सेवेचे कॅगने वाभाडे काढले होते, त्यानंतर लगेचच ही घटना घडल्याने रेल्वे प्रशासन चिंतेत आहे.
रत्नागिरी स्टेशन सोडल्यानंतर प्रवाशांना उलटी होत असल्याचे तिकीट तपासनीसाच्या लक्षात आले. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता चिपळूण स्टेशनवर गाडी थांबविण्यात आली. रेल्वेच्या डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर विषबाधित २४ प्रवाशांना लाइफकेअर इस्पितळात दाखल करण्यात आले.
शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर चिपळूणचे शिवसेना आ. सदानंद चव्हाण यांच्यासह नागरिकांनी विषबाधा झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशनने (आयआरसीटीसी) दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार या रेल्वेतील खानपान सेवेचे कंत्राट जे. के. घोष कंपनीस दिलेले आहे. रविवारी एकूण २२० प्रवाशांना नाश्ता पुरविण्यात आला. त्यापैकी १३० प्रवाशांनी शाकाहारी तर इतरांनी मांसाहारी नाश्ता घेतला होता. विषबाधा झालेल्यांपैकी बहुतेकांनी आॅम्लेट खाल्ले होते. पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सर्वात जलद धावणारी रेल्वे
गोव्यातील करमाळी आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणारी ही तेजस एक्स्प्रेस ताशी २०० किमी वेगाने धावते. तेजस ही देशातील सर्वात जलद धावणारी एक्स्प्रेस आहे. तेजसच्या प्रत्येक डब्याच्या निर्मितीसाठी रेल्वेला ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च आला आहे.
आधुनिक सुखसोयी असलेली सेमी हाय स्पीड गाडी म्हणून गाजावाजा करून जूनमध्ये उद््घाटन केले होते. या रेल्वेतील स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग पॉइंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती व्यवस्था, सेलीब्रिटी शेफ मेन्यू आणि कॉफी व्हेंडिंग मशीन अशा अत्याधुनिक सोयींची मोठी प्रसिद्धी केली गेली होती.