शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती, जिल्हा परिषद प्रशासनासमोर पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:20 PM2019-05-03T12:20:16+5:302019-05-03T12:22:25+5:30
सुगम-दुर्गम भागातील शाळांची यादी चुकीची केलेली असतानाही त्यामध्ये बदल न करताच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याविरोधात अपिल केलेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांच्या बदल्यांना कोकण विभागीय आयुक्तांनी आज स्थगिती दिली. त्यापूर्वी कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
रत्नागिरी : सुगम-दुर्गम भागातील शाळांची यादी चुकीची केलेली असतानाही त्यामध्ये बदल न करताच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याविरोधात अपिल केलेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांच्या बदल्यांना कोकण विभागीय आयुक्तांनी आज स्थगिती दिली. त्यापूर्वी कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची सुगम-दुर्गमची यादी करताना मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला होता. या यादीमध्ये दुर्गम भागातील अनेक शाळा सुगम भागात, तर सुगम भागातील शाळा दुर्गम भागात दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या याद्या बदली करण्यासंदर्भात शिक्षण समितीच्या सभेतही ठराव करण्यात आला होता.
दरम्यान, सुगम-दुर्गमची चुकीची यादी दुरुस्ती करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी शासनाकडे पाठविली होती. ती यादी बाजूला ठेवून शासनाने जिल्ह्यातील ३३४८ शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदलीचे आदेश शासनाने काढले होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर अनेक वर्षे दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांना या बदल्यांमुळे दिलासा मिळाला होता.
सुगम - दुर्गम शाळांच्या यादीमध्ये दुरुस्ती न करताच बदल्या करण्यात आल्याने अनेक महिला शिक्षकांना अति दुर्गम भागातील शाळांमध्ये जावे लागले होते. पती-पत्नी असलेल्या शिक्षकांना १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळांमध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे याच्या विरोधात अन्यायग्रस्त शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
त्यानंतर बदली झालेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे अपिल केले होते. या अपिलाची सुनावणी गुरुवारी आयुक्तांकडे झाली. अपिल केलेल्या शिक्षकांचा बदलीला कोणताही विरोध नव्हता. केवळ त्यांचा चुकीच्या यादीला विरोध होता.
सुगम - दुर्गम शाळांची यादी चुकीची करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दुरुस्तीची यादी पाठवूनही शासनाने ती न स्वीकारताच या बदल्या करण्यात आल्याचे शिक्षकांच्या वकिलांनी आयुक्तांसमोर म्हणणे मांडले. त्यानंतर आयुक्तांनी अपिलात गेलेल्या १९२ शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदली झालेल्या शिक्षकांना आज गुरुवारी कार्यमुक्त करुन दि. ३ मे रोजी शुक्रवारी हजर होण्याचे आदेश सर्व तालुक्यांना दिले होते. त्यानुसार आज बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. बदली झालेल्या शाळांमध्ये अनेक शिक्षक हजरही झाले आहेत. मात्र, १९२ शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती दिल्याने त्यांच्या शाळेवर हजर होणाºया शिक्षकांसमोर अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.