बदल्यांना स्थगिती; शिक्षकांना दिलासा
By admin | Published: May 14, 2016 12:02 AM2016-05-14T00:02:29+5:302016-05-14T00:02:29+5:30
शिक्षकांचे समुपदेशन न करण्याचा निर्णय
रत्नागिरी : जिल्ह्यातील ४७७ मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्याशिवाय शिक्षकांचे समुपदेशन न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षक बदल्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटना व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाने बदलीच्या रडारवर असलेल्या २२५ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
शंभरपेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर मुख्याध्यापक नियुक्तीसाठी प्रयत्न करतानाच १५ दिवसांमध्ये शिक्षणमंत्र्यांसमवेत जिल्हा परिषद पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले आहे. यावेळी आमदांरासह शिक्षण सभापती विलास चाळके, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संचमान्यता अपूर्ण असल्याने सहा महिन्यांनी पुन्हा बदल्यांची प्रक्रिया राबवावी लागणार आहे, असा मुद्दा शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. संचमान्यता पूर्ण होईपर्यंत समायोजन आणि बदल्या करु नयेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली.
संचमान्यतेनंतर मुख्याध्यापकांचे पदावनत करण्यात येऊन ते उपशिक्षक होणार आहेत. यामुळे बदल्यांची प्रक्रिया होऊन सेवा निवृत्तीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना अन्य तालुक्यात जाणे त्रासदायक ठरणार आहे.
त्यामुळे संचमान्यता पूर्ण होईपर्यंत समायोजन आणि समुपदेशन घेऊन बदल्या न करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला. मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यास शिक्षकांच्या बदल्यांची संख्या कमी होऊन जवळपास ती १०० होणार आहे. त्यामुळे समुपदेशनाला मिळालेल्या स्थगितीमुळे अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. (शहर वार्ताहर)