नीलिमा चव्हाणचे सी. ए. बनण्याचे स्वप्न अधुरे!, आठवणीने ग्रामस्थ गहिवरले
By संदीप बांद्रे | Published: August 3, 2023 05:13 PM2023-08-03T17:13:05+5:302023-08-03T17:42:55+5:30
आमदार शेखर निकम व भास्कर जाधव यांनी पावसाळी अधिवेशनात निलीमा चव्हाण हिच्या मृत्यू विषयी सखोल चौकशीची मागणी केली
चिपळूण : अत्यंत हुशार, नियमीत अभ्यासात गुंतलेली व उच्च शिक्षणासाठी कायम धडपडणारी नीलिमा सुधाकर चव्हाण हिच्या निधनाने चिपळूणवासीयांना रूकरूक लागून गेली आहे. चव्हाण कुटुंबातील तिन्ही भावंडे उच्च शिक्षीत असून स्टेट बँकेत कंत्राटी पद्धतीने नोकरी करणाऱ्या निलीमाला सीए बनायचे होते. मात्र तिचे हे स्वप्न अपुरे राहिले आहे. तिच्या अशा अनेक आठवणीने ओमळी ग्रामस्थ गहिवरले आहेत.
तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी असलेली नीलिमा चव्हाण या २४ वर्षीय बेपत्ता तरूणीचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यानंतर आता नीलिमा हिचा मृत्यू घातपात असल्याचा संशय असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात देखील आमदार शेखर निकम व भास्कर जाधव यांनी नीलिमा हिच्या मृत्यू विषयी सखोल चौकशीची मागणी केली आहे. याशिवाय अनेक सामाजीक संस्था व राजकीय पक्षांनी देखील तिच्या मृत्यूची दखल घेत कँडल मार्च व निवेदने सादर करत चौकशीची मागणी केली आहे. या घटनेने ओमळी ग्रामस्थांना देखील मोठा धक्का बसला आहे. गावातील हुशार व सामाजिक उपक्रमांत नेहमी सक्रीय असलेली नीलिमा आज अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.
ओमळी येथील न्यु इंग्लिश स्कूल मध्ये दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या नीलिमाची शाळेत हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळख होती. त्यामुळे तिच्या शिक्षणाला चव्हाण कुटुंबाकडूनही तितकेच प्रोत्साहन दिले जात होते. अकरावी व बारावीचे शिक्षण तिने शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या आनंदराव पवार महाविद्यालयात घेतले. त्यानंतर डिबीजे महाविद्यालयात बी. कॉम व एम.कॉम पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. एवढे शिक्षण घेतल्यानंतर देखील तिला पुढील शिक्षणाची ओढ कायम होती. त्यातून तिने सीए बनण्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि त्याचा अभ्यास देखील तिने सुरू केला होता.
अशातच स्टेट बँकेच्या दापोली शाखेत कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळाल्याने तिने नोकरी सांभाळत सीए चा अभ्यास सुरू ठेवला होता. तिचे दोन्ही भावंडे अक्षय व चंद्रकांत हेही उच्च शिक्षीत असून अक्षय याने एमबीए पर्यंत शिक्षण घेऊन तो लोटे येथे नोकरीस आहे. तर चंद्रकात यानेही बिकॉम पर्यंतचे शिक्षण पुर्ण करून सध्या तो सैनिकी भरतीचा अभ्यास करतो आहे. नीलिमा ही अत्यंत शांत व सुस्वभावी होती. नीटनेटके राहणीमान व कायम अभ्यासात गुंतलेली असायची. त्यामुळे तिच्या मृत्यूची हुरहूर सर्वच ओमळी ग्रामस्थांना लागून राहिली आहे.